वर्षभरापूर्वी बाजारात आवक प्रचंड वाढल्याने जेमतेम पाच रुपये किलो भावाने विकल्या जाणाऱ्या आद्रकासाठी सध्या मात्र आवक लक्षणीय घटल्याने किलोमागे तब्बल दीडशे रुपये मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. जांभळाच्या भावाबाबतही हीच स्थिती पाहावयास मिळत आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये उत्पादन कमी झाल्यामुळे आद्रकाचा भाव किलोमागे ३० रुपयांपर्यंत वाढला होता. मात्र, आता उत्पादन फारच कमी असल्यामुळे आद्रकाचे भाव १५० रुपयांच्या घरात जाऊन पोहोचले आहेत. बाजाराची गरज लक्षात घेऊन एखाद्या विशिष्ट चीजवस्तूचे उत्पादन वाढले तर भाव पडतात. परंतु बाजारात मागणी वाढली व उत्पादन कमी झाले की भाव वधारतात, हे सर्वमान्य गणित आहे. बाजारातील तेजी-मंदीचे सूत्र ज्यांना कळते तेच यशस्वी होतात अन्यथा आतबट्टय़ाचा व्यवहार करण्याची वेळ येते.
जी गत आद्रकाची, तीच पावसाळय़ाच्या दिवसांत हमखास दिसणाऱ्या व हवेहवेसे वाटणाऱ्या जांभळाची. गेल्या वर्षी कमी पावसामुळे जांभळाचे उत्पादन लक्षणीय घटले. साहजिकच एरवी कुरकुलेभर जांभळे देणारी मंडळी आता मात्र थेट १५० रुपये प्रतिकिलो भावाने जांभूळ विकत आहेत. ‘होती आली येळ अन् गाजराचं झालं केळ’ अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. प्रत्येक वस्तूला योग्य भाव मिळण्यासाठी योग्य वेळ साधली पाहिजे. यावर्षी आद्रक व जांभळाने ती वेळ साधल्याचे दिसून येते.