एकिकडे हळुवार जावणाऱ्या गारव्याची जागा आता हुडहुडीच्या थंडीने घेतली असतांना दुसरीकडे हिवाळ्यातील आरोग्यदायी व पौष्टिक आहाराकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात भाजीपाल्याची चांगलीच साथ मिळाली आहे. आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे कधी नव्हे इतके भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहे. नेहमीच चढय़ा राहिलेल्या भाजीपाल्यांचे दर सध्या सर्वसामान्यांच्या आटोक्यात आल्यामुळे महिला वर्ग सुखावला आहे. ही परिस्थिती साधारणत: आठ ते १५ दिवस राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
डिसेंबरच्या सुरूवातीस थंडीचा जोर काहीसा कमी असला तरी फळभाज्या, पालेभाज्यांना काहीसे पोषक वातावरण राहिले आहे. या हंगामात वैद्यकीय मंडळीकडून पौष्टिक आहार घेण्याचा सल्लाही दिला जातो. उन्हाळा, पावसाळाच्या तुलनेत या मोसमात खवव्य्यांचे चोचले पुरविण्यासाठी विविध  प्रकारचा भाजीपाला मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध राहतो. भाज्यांची उपलब्धता मोठय़ा प्रमाणावर असल्याने बाजार समितीच्या आवारात अनेक भाज्यांचे भाव घसरले आहेत. तुलनेत पालेभाज्यांचे भाव गेल्या काही दिवसात चढे राहिल्याचे बाजारपेठेच्या स्थितीवरून लक्षात येते. काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कारले, दोडके, भेंडी, गवार, मटार यांची आवक कमी असल्याने त्यांचे दर चढे राहिले.  दोडके-२०८०-३३२५, भेंडी १६६५-३१२५, गवार-२५००-४०४०, ओला वाटाणा १६००-२००० असे हे दर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर जुडी (१०० जुडय़ा) ३००-१२००, मेथी ४००-८०० असे दर होते. मात्र सध्या समितीच्या आवारात भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर झाल्याने भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. त्यात प्रामुख्याने टमाटा, कोबी, दुधी, गाजर, कांदा पात, ढोबळी मिरची आदींचा समावेश आहे. असे असले तरी मेथी व कोथिंबरीचे भाव वाढले आहेत. फळभाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर झाल्यामुळे पालेभाज्यांच्या तुलनेत त्यांचे भाव कमी आहेत. शेतक ऱ्यांच्या उत्पादनावर पुढील भाव अवलंबून आहेत. सध्या बाजार समितीत सिमला मिरची, भेंडी, वालपापडी, घेवडा यांना मोठी मागणी आहे.
घाऊक बाजारात दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना किरकोळ खरेदी करताना त्याचा लाभ होत आहे. किरकोळ बाजारात टमाटा प्रती किलोस १० रूपये, काकडी ३०, फ्लॉवर, कोबी,वांगी, गाजर, वाल, हिरवा वाटाणा प्रत्येकी २०, भेंडी ५०, सिमला मिरची ४०, दोडका ६०, मेथी १०, पालक ५, कोथिंबिर ३०, कांदापात ६, हिरवी मिरची २० रूपये दराने मिळत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून भाज्यांचे दर चढेच राहिले.
परंतु, पंधरवडय़ापासून मालाची आवक मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने भाज्यांचे दर कमी झाले. त्यातही भेंडी, दोडका, काकडी हे हंगामाच्या व्यतिरीक्त भाज्या असल्याने त्यांचे दर चढे आहेत. तरीदेखील ग्राहकांकडून त्यांची मागणी मोठय़ा प्रमाणावर असल्याचे भाजी विक्रेते रवी बोडके यांनी सांगितले.
तसेच सध्या ३१ डिसेंबरचा माहोल तयार होत असल्याने
अनेकांनी गाजर, ओला वाटाणा मोठय़ा प्रमाणावर खरेदी करण्याकडे कल ठेवला आहे. साधारणत: आठ ते १५ दिवस ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाजही विक्रेत्यांनी व्यक्त केला.