मोहरम विसर्जनाच्या पुर्वसंध्येला कत्तलच्या रात्रीनिमित्त बारा इमाम कोठला येथे भविकांची मोठी गर्दी झाली होती. उद्या (रविवारी) मोहरमचे विसर्जन होणार आहे. त्याचीही तयारी पुर्ण झाली असुन बंदोबसत्साठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. कोठला येथे स्थापन करण्यात आलेल्या इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवाऱ्यांसाठी कालपासुनच येथे भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. या सवाऱ्यांमुळेच देशभर प्रसिध्द असलेल्या नगरच्या मोहरमसाठी बाहेरूनही मोठय़ा प्रमाणार भाविक येथे दाखल झाले आहेत. काल (शुक्रवार) जिल्हा पोलीस प्रमुख आर. डी. शिंदे, उपाधीक्षक संजय बारकुंड, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी यांच्या सह माजी आमदार दादा कळमकर, माजी महापौर संग्राम जगताप, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले आदींनी येथे या सवाऱ्यांचे दर्शन घेऊन चादर अर्पण केली.
आज रात्री १२ वाजता प्रथेप्रमाणे कोठला येथून इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या सवाऱ्यांची कत्तलच्या रात्रीची मिरवणूक काठण्यात आली. उद्या (रविवार) दुपारी १२ वाजता याच सवाऱ्यांची येथूनच विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गासह कोठला परिसर व इतर संवेदनशील भागात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकडय़ांचीही मदत घेण्यात आली आहे.