राजकीय संघर्षांमुळे खुंटलेला विकासाचा गाडा खुला करण्यासाठी केलेला घरोबा सन्मानाचाच उरलेला नाही, म्हणून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी पुन्हा एकदा दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादीचेच शिलेदार असलेले संजय (काका) पाटील आणि अजित घोरपडे रणांगणावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांची होणारी ससेहोलपट संपविण्यासाठी बंडाचे निशाण खांद्यावर घेतल्याचे खुद्द संजय पाटील यांनीच सांगितल्याने तासगाव कवठेमहांकाळच्या रणभूमीवर दिवाळीपूर्वीच शाब्दिक अस्त्रांचा मुक्तहस्ते वापर सुरू झाला आहे.
तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यांच्या संयुक्त असणाऱ्या विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व गृहमंत्री आर. आर. पाटील करीत आहेत. तासगावमधील राजकीय संघर्ष पूर्वीपासूनच चालू होता. तासगाव कारखान्याचे संस्थापक दिनकर (आबा) पाटील यांच्याशी संघर्ष करीत आर. आर. पाटील यांचे राजकारण उभे राहिले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या सत्ता संघर्षांला सांगलीच्या ‘विजय’ बंगल्यातून ताकद आणि मानसिक बळ मिळत गेले. याचा परिणाम म्हणून आर. आर. पाटील यांना विधानसभेची संधी मिळाली. मात्र ही संधी दोन-अडीच हजार मतांच्या फरकानेच मिळत गेल्याने सातत्याने संघर्षांचा वणवा तेवतच राहिल्याचे चित्र दिसून येत होते.
ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील यांनी संजय पाटील आणि आर. आर. पाटील यांच्यामध्ये तंटामुक्ती घडवून आणली. त्यामुळे राजकीय पातळीवर नेत्यांमध्ये झालेला युतीचा फॉम्र्युला लोकांनी स्वीकारलाच असे म्हणता येणार नाही. तरीसुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत हा संघर्ष पडद्याआड गेला हे मान्यच करावे लागेल. संघर्ष संपुष्टात आणल्याची पोचपावती म्हणून संजय पाटील यांना विधान परिषदेचे सदस्यत्व राष्ट्रवादीच्या कोटय़ातून मिळाले आणि तासगाव कारखाना पाटील यांच्या गणपती जिल्हा संघाला चालविण्यास मिळाला.
तथापि गेल्या तीन-चार वर्षांत चिंचणी-अंजनीच्या दोन पाटलांच्या मधला संघर्ष धुमसत राहिला. दुसऱ्या बाजूला मतदार संघाच्या पुनर्रचनेत विस्थापित झालेले कवठेमहांकाळचे अजित घोरपडे संजय पाटील यांना मिळाले. राजकारणात एका पाटलाविरुद्ध दोन गट एकत्र आल्याने राजकीय ताकद निश्चितच वाढली आहे. सत्ताधीश बनलेल्या आर. आर. आबांना तासगाव-कवठय़ाच्या रणांगणावरच गुंतवून ठेवण्याची तयारी आतापासूनच सुरू आहे. संजय पाटील,अजित घोरपडे विधान सभा निवडणुकीच्या तयारीनेच आतापासून संपर्क मोहीम राबवित आहेत. गावागावात बठका सुरू असून ‘स्वाभिमान’  हेच भांडवल घेऊन दोघेही संघर्षांच्या पावित्र्यात आहेत.
एकीकडे सत्तेबद्दलची असणारी नाराजी संग्रहीत करण्याचा प्रयत्न करीत असताना आर. आर. पाटील यांच्या खंद्या समर्थकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांची  उणीदुणी काढण्याचा प्रयत्नही सुरू आहे. यातूनच सावळज येथे आर. आर. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या बलगाडी शर्यतीवेळी बलांचा झालेला छळ पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला. कवठेमहांकाळचे चंद्रकांत हक्के यांनी शासनाचे स्वामित्व धन चुकवून जमा केलेला वाळूचा साठा शासनाच्या निदर्शनास आणण्यात पुढाकार घेतला. केवळ पुढाकारच नाही तर, १५ कोटी रुपयांचा दंड ठोठावत फौजदारी दाखल करण्यापर्यंत हे प्रकरण नेण्यात घोरपडे-पाटील यांचा सिंहाचा वाटा होता.  
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात मदानात कोणी उतरायचे हे अद्याप निश्चित नसले तरी, संजय (काका) पाटील आणि अजित घोरपडे या दोघांपकी कोणी ना कोणी समोर असणारच हे आता स्पष्ट झाले आहे. अजित घोरपडे यांनी एकेकाळी तत्कालीन राज्यमंत्री शिवाजीराव शेंडगे यांच्याविरुद्ध संघर्ष करीत विकास आघाडीच्या झेंडय़ाखाली सत्ताधारी गटाचा पराभव केला होता. तोच इतिहास पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या गाव पातळीवरच्या राजकारणातून दिसून येत आहे.
गृहमंत्री पाटील यांच्या विरोधात होऊ घातलेली बंडाळी थोपविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे करीत आहेत. मात्र संयुक्त बठक घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना सध्या तरी पाटील-घोरपडे यांनी दाद दिलेली नाही. तासगाव साखर कारखान्याची मालकी आणि राजकीय विस्थापित यामुळे पुन्हा तंटामुक्ती होण्याची चिन्हे सध्या तरी दुर्मिळ दिसत आहेत.