जायकवाडीला पाणी दिल्याने पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून त्यापोटी राज्य सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की धरणांचा उद्देशच मुळात सिंचनासाठी असून ते भरल्यावर शेतकरी पिकाचे नियोजन करतात. यावर्षी रब्बीसाठी दोन व उन्हाळी तीन असे आवर्तने गृहीत धरून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन केले होते. परंतु सरकारने कोणत्याही विरोधाला न जुमानता पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जायकवाडीला पाणी सोडले. वास्तविक हे पाणी औरंगाबाद व परिसरातील उद्योगांसाठी सोडण्यात आले. या उद्योगांना जायकवाडीतून सर्रास पाणी सुरु आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा ऊस व फळबाग पिकांना एकरी एक लाख रुपये, तर अन्य पिकांसाठी एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जितेंद्र भोसले, बापूसाहेब आढाव, सुरेश ताके, ज्ञानेश्वर सोडणार, शिवाजी जवरे, भास्कर थोरात, हरिभाऊ तुवर यांनी केली आहे.
दरम्यान, भंडारदरा धरणाच्या आवर्तनाबद्दल अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी माजी आमदार जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यावर टीका केली आहे. धरणातून शेतीसाठी एकच आवर्तन मिळणार आहे. त्यामुळे शेती आवर्तनासाठी फक्त सात नंबर अर्जावरच पाणी मिळणार असून, केवळ एकाच आवर्तनाचा निर्णय झाला आहे. मात्र, केवळ शेतकऱ्यांचा असंतोष दाबण्यासाठी कांबळे व ससाणे तीन आवर्तने मिळणार असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या नोटिशीवरूनच ही बाब स्पष्ट होते, असे गलांडे यांनी म्हटले आहे.