मलकापूर नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या दुस-या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँग्रेसअंतर्गत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटामध्ये शाब्दिक झाडाझडती सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. परिणामी, विधानसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या सुरू असलेल्या उखाळय़ापाखाळय़ा तमाम जनतेसाठी गमतीच्या ठरू लागल्या असून, हा एक प्रदीर्घ चर्चेचा विषय बनला आहे.
गेल्या आठवडय़ात उंडाळकर गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या गटावर नामोल्लेख टाळत झालेल्या जोरदार टीकेवर मुख्यमंत्र्यांच्या गटानेही प्रत्यारोपांची तोफ डागत ‘जशास तसे’ अशी खंबीर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात मलकापूरच्या नगराध्यक्ष शारदा खिलारे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह सर्व सदस्यांनी आपल्या नेत्यांविषयी गरळ ओकण्याचा प्रयत्न करणा-यांचा निषेध केला आहे. काचेच्या घरात राहून दुस-याच्या घरावर दगड मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये असा सल्लाही पत्रकात देण्यात आला आहे. मलकापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या देदीप्यामान यशामुळे काँग्रेस पक्षाच्या जिवावर राजकारणात मोठे झालेल्यांच्या पोटात पोटशूळ का, असा प्रश्न उपस्थित करून मलकापूरचा ऐतिहासिक निकाल तथाकथित जनाधाराचा ठेका घेतलेल्या नेत्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांना पचनी पडला नसल्याची टीका केली गेली आहे.
पराभवाचे शल्य त्यांना पचवता न आल्याने पराभूत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आमच्या नेत्यांविषयी गरळ ओकण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केला जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. कराड पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत असताना आपल्या बगलबच्चा एक सदस्य गैरहजर ठेवण्याचे पाप करून राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती व अपक्षाला उपसभापती केले. तुमचे पक्षवाढीसाठीचे योगदान काँग्रेस पक्षाला व कराडच्या जनतेला माहीत आहे. सोयीप्रमाणे व स्वत:च्या स्वार्थासाठी पक्षाचा सातत्याने वापर करणा-याआमदारांना मलकापुरात काँग्रेसचा हात हायजॅक केला असे म्हणण्याचा नैतिक अधिकार आहे का? उलट मलकापुरात हाताच्या विरोधात ज्यांना गावाने नाकारले त्यांनी आमची व काँग्रेस पक्षाची मापे काढू नयेत. पराभवामुळे तुम्ही नैराश्याने ग्रासलेले आहात, याची प्रचिती स्नेहमेळाव्यात जनतेला आलेली आहे. कराड दक्षिणमध्ये पक्षाचे तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय पक्ष घेईल. आपण पक्षाचा सर्वनाश करण्याकरिता असंख्य आघाडय़ा केल्या, तीच जनता काँग्रेस पक्षाच्या झेंडय़ाखाली एकत्र आल्याचे पाहून आपल्या काळजात धडकी भरली आहे. मलकापूरच्या विकासासाठी नेतेमंडळींनी एकत्र येऊन मलकापूरच्या हितासाठी मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक लढवून १७-० असा देदीप्यमान विजय मिळवला आहे. मलकापूर शहरामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका सुरू असून, कोटय़वधींची विकासकामे केल्यामुळेच जनतेने विश्वास दाखवून पुन्हा काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे मलकापुरात आपल्या माध्यमातून कोणता विकास केला व कोणता निधी परत गेला हे जाहीरपणे सांगावे असा सवाल मलकापूर नगरपंचायतीच्या सत्ताधा-यांनी केला आहे.
केवळ मलकापूर शहरामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचाराने व मार्गदर्शनाने शाश्वत विकास झाल्यामुळेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मतदारांनी ६९ टक्के मतदान केले आहे. उर्वरित ३१ टक्के मतदानामध्ये मनसे अपक्ष व आघाडीचा समावेश असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.