अलाहाबाद येथे जानेवारी ते मार्च २०१३ या कालावधीत होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्रातून दहा रूग्णवाहिका, ५० डॉक्टर, उत्तम दर्जाची औषधे तसेच अद्ययावत आपतकालीन प्रशिक्षित पथक पाठविण्याचा निर्णय रेड स्वस्तीक सोसायटीच्या येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला.
नाशिक येथे याआधी झालेल्या कुंभमेळ्यात सोसायटीच्या नाशिक शाखेतर्फे आरोग्य शिबीरात बहुमूल्य कामगिरी करण्यात आली आहे. याशिवाय उजैन, हरिव्दार येथील कुंभमेळ्यातही उपक्रम राबविण्यात आले आहेत. पुढील वर्षांत अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी काय करता येऊ शकेल, याविषयी येथे आयोजित राज्यस्तरीय चिंतन व नियोजन बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते तर, राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पटेल, महाव्यवस्थापक टी. एस. भाल, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थान सुरेश कोते यांनी भूषविले. प्रास्तविक राज्य सचिव अशोक शिंदे यांनी केले. स्वागत नाशिक शाखेचे अध्यक्ष चेतन पटेल यांनी मानले.
बैठकीस रवींद्र जाधव, भाल, पटेल, कोते यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य सेवेसह अलाहाबादच्या स्वयंसेवकांना आपतकालीन प्रशिक्षण देण्यासाठी अद्ययावत प्रशिक्षित पथक पाठविण्यावर सर्वानुमते सहमती दर्शविण्यात आली.