वारजे माळवाडी येथे राहणाऱ्या पती-पत्नीचा खून करून २५ लाखांची रोकड व मोटार चोरून नेणारे दोन्ही हल्लेखोर अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, खून झालेल्या पतीचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतला, तर पत्नीचा मृतदेह घेण्यासाठी तिचे नातेवाईक नेपाळहून येणार आहेत. कमलाकर शंकरराव रणगेरी (वय ५५, रा. स्टर्लिग अपार्टमेंट, वारजे माळवाडी, मूळ गाव- कर्नाटक) आणि त्यांची पत्नी शिमला (वय ५०, मूळ गाव- नेपाळ) यांचा मंगळवारी खून झाला. त्यांना मुले नाहीत. त्यांच्याकडे गेल्या सात वर्षांपासून दीप बहादूर तमांग (वय २२) आणि सनी लामा (वय २१) हे तरुण राहतात. यातील तमांग हा सिंहगड कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे, तर लामा हा त्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करतो. कमलाकर यांच्या पत्नीचे ते नातेवाईक  आहेत. खुनानंतर ते दोघेही बेपत्ता आहेत. त्यांनी खून केल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.