शहरातील मुख्य रस्त्यांवरील इमारतीत कार्यान्वित हॉटेल्समुळे रहिवाशांचा जीव कसा टांगणीला लागू शकतो, ही बाब सोमवारी कॉलेज रोडवरील डी. जे. हौसिंग सोसायटीत पाहावयास मिळाली. इमारतीच्या तळमजल्यावरील कृष्णा फास्ट फूड या हॉटेलमध्ये सिलिंडरमधून गॅसगळती होऊन आग लागली. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वरील भागात वास्तव्यास असलेल्या कुटुंबीयांना जीव मुठीत धरून बसावे लागले. अध्र्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. इमारतीतील तीन हॉटेल्सविषयी वारंवार तक्रार करूनही पोलीस व महापालिकेने त्याची दखल नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
कॉलेज रोडवर डी. जे. हौसिंग सोसायटी या इमारतीत सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीच्या तळ मजल्यावर कृष्णा फास्ट फूड, उडपी स्पाइस आणि मधुरावासी चाट भांडार अशी तीन हॉटेल्स आहेत. त्यातील कृष्णा फास्ट फूडच्या स्वयंपाकगृहात सिलिंडरमधून गॅस गळती होऊन ही आग लागली. आसपासच्या महाविद्यालयांच्या सान्निध्यामुळे या ठिकाणी नेहमीच मोठी गर्दी असते. हॉटेलमधून धूर बाहेर येऊ लागल्याने एकच खळबळ उडाली. इमारतीच्या वरील भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची बिकट अवस्था झाली. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभाग व पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी अग्नी प्रतिबंधक साहित्याद्वारे आग रोखण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यानच्या काळात अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि ही आग नियंत्रणात आणली गेली.
या दुर्घटनेमुळे साधारणत: अर्धा तास या ठिकाणी गोंधळसदृश स्थिती निर्माण झाली. हॉटेल्समुळे होणाऱ्या त्रासाबद्दल इमारतीतील रहिवाशांनी आधीही पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी पुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु पोलीस यंत्रणेकडून आमची बोळवण करण्यात आल्याची तक्रार रहिवाशांनी केली. दोन हॉटेल्समधील ४० ते ४५ कर्मचाऱ्यांनी राहण्यासाठी इमारतीतील सदनिकेचा वापर केला आहे. हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू राहात असल्याने रात्रीच्या वेळी संबंधितांमार्फत गोंधळ घातला जातो.
हॉटेल्ससाठीचा भाजीपाला सदनिकेत साठविला जात असल्यामुळे प्रचंड दरुगधी पसरते. हॉटेल्ससाठी घरगुती सिलिंडरचा वापर केला जातो. ही सिलिंडरही सदनिकेत साठविली जातात. पाण्यासाठी स्वतंत्र जोडणी घेऊन हॉटेल्सचालक वीज पंप लावून खुलेआमपणे पाणी खेचतात. हॉटेल्सची चिमणी उभारताना सोसायटीची परवानगी घेतली गेली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला. दरम्यान, या संदर्भात गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले.
हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल होणार का?
रहिवासी इमारतीत बेकायदेशीरपणे सिलिंडरचा साठा करणे अथवा निष्काळजीपणे वापर करून आगीच्या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्यावरून काही वर्षांपूर्वी कॉलेज रोडवरील जलाराम फरसाण मार्टच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या स्वरूपाची कारवाई कृष्णा फास्ट फूडच्या चालकाविरुद्ध होणार काय, असा प्रश्न इमारतीतील रहिवासी उपस्थित करीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनाशिकNashik
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residentals suffered due to fire in hotel
First published on: 24-06-2014 at 07:01 IST