महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत अस्तित्वात असणाऱ्या तंटय़ांबरोबर नव्याने निर्माण झालेले तंटे मिटविण्याची जबाबदारीदेखील तंटामुक्त गाव समितीवर आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून समिती प्रतिबंधात्मक उपाय करते. पण, तरी काही तंटे निर्माण होतात. त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
दर वर्षी ३० सप्टेंबरनंतर मोहीम कालावधीत नव्याने निर्माण झालेले तंटे मिटविण्याचे काम समितीला करावे लागते. अस्तित्वातील तंटय़ांचे ज्या प्रमाणे वर्गीकरण करून नोंदवहीत नोंद करावी लागते, त्याप्रमाणे नव्याने निर्माण झालेल्या तंटय़ांचे वर्गीकरण करावे लागते. गावामध्ये एखादा तंटा निर्माण झाल्यास शक्यतोवर तंटा घडलेल्या ठिकाणाजवळ राहणाऱ्या तंटामुक्त गाव समितीच्या सदस्याने संबंधित प्रकरणात हस्तक्षेप करणे अपेक्षित आहे. म्हणजे कोणत्याही कारणावरून वाद उद्भवला असेल तर सदस्याने तो मिटविण्याचा प्रयत्न करावा. असा हस्तक्षेप करूनही तंटा मिटण्याची शक्यता दिसत नसल्यास सदस्य समितीच्या अध्यक्षांशी संपर्क साधून त्यांची मदत घेऊ शकतो. त्यानंतर समितीमार्फत उभय पक्षकारांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला जातो. नवीन निर्माण झालेले तंटेही अस्तित्वातील तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या कार्यपद्धतीप्रमाणे मिटविण्याची कार्यवाही समितीला करावी लागते.
गावात कधी कधी एखादा तंटा असा घडला असेल, पण तो कोणत्याच माध्यमातून समितीसमोर आला नाही तर समिती त्याबाबतीत ऐकीव माहितीवर प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घेऊ शकते. त्यात तथ्य आढळून आल्यास तो तंटाही समितीला विचारात घ्यावा लागतो. नव्याने निर्माण झालेले मिटलेल्या तंटय़ांची नोंदही समितीला स्वतंत्रपणे करावी लागते. मोहिमेच्या काळात काही लोकांचे अर्ज परस्पर पोलीस ठाण्यात जातात.
अशा प्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखास सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार त्याची दखल घेऊन चौकशी व कारवाई करावी लागते. मात्र, असा अर्ज प्राप्त झाल्यावर त्या अर्जातील या मोहिमेमध्ये मिटविता येणारे तंटय़ांमध्ये जे तंटे मोडतात, त्यांच्या अर्जाची एक प्रत तंटामुक्त गाव समितीकडे पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे समितीलाही अशा प्राप्त अर्जाची दखल घेऊन तक्रार मिटविण्याचा समांतर प्रयत्न करता येतो. संबंधित अर्जातील तंटा मिटल्यास तडजोडनाम्याच्या आधारावर ते प्रकरण पोलीस ठाण्याच्या स्तरावर निकाली काढले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदाचे सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध लेख मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील हा सहावा लेख.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Responsibility of tantamukta village
First published on: 04-12-2013 at 11:37 IST