अधिकाऱ्यांच्या बेपवाईने उजनी धरणातील चोरीला गेलेले ८ टीएमसी पाणी त्यामुळे जिल्ह्य़ावर ओढवलेले जलसंकट चाराटंचाई व दुष्काळी परिस्थिती आदींचा आढावा घेण्यासाठी गेल्या काही वर्षांनंतर प्रथमच अकलूजला १८ रोजी आढावा बैठक होत आहे.
अकलूजच्या सहकारमहर्षी साखर कारखान्यावर होणाऱ्या या आढावा बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उजनी धरणातील ८ टीएमसी पाणीचोरीचा प्रश्न शेती काही दिवसापासून ऐरणीवर आला असून त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी जिल्ह्य़ातील काही आमदारांनी सामूहिकपणे केली आहे. त्याचबरोबर गतवर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्य़ात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व पाणी आदी प्रश्न निर्माण झाले असून रब्बीचा हंगामही वाया गेला आहे. त्या अगोदरच्या खरिपानेही शेतक ऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले. या सर्व बाबींचा ऊहापोह करून त्यावर मार्ग काढण्यासाठी बैठकीत चर्चा होणार आहे.
पुणे जिल्ह्य़ातील भीमा आसखेड धरणात बसून असलेले १० टीएमसी पाणी उजनीत सोडावे व उजनी कालव्यातून पाण्याची दोन आवर्तने सोडावीत अशी मागणी आ. विजयसिंह मोहिते पाटील करणार आहेत.  
गेली ३ वर्षांत पालकमंत्र्यांशिवाय अकलूजकडे राष्ट्रवादीचे कुणीही वरिष्ठ नेते फिरकले नसताना गेल्या आठवडय़ात गृहमंत्री आर. आर. पाटील व आता दस्तुरखुद्द शरद पवार, अजित पवार येणार असल्याने या बैठकीमुळे जिल्हा राजकारणाला कलाटणी मिळणार काय अशी चर्चा होत आहे.