इगतपुरी तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताची कापणी सध्या अंतीम टप्प्यात असून त्याची आवक वाढल्यामुळे घोटी बाजारपेठेत भाव कोसळले आहेत. इगतपुरी तालुक्यासह त्र्यंबकेश्वर, खोडाळा, सिन्नर, अकोले आदी भागातून दररोज लाखो क्विंटल भात घोटी शहरात विक्रीस येत असून व्यापाऱ्यांनी तो अल्प किंमतीत खरेदीचा सपाटा लावला आहे. परंतु, दुसरीकडे प्रक्रिया केलेल्या तांदळाच्या किंमतीत ही घसरण झालेली नाही. म्हणजे, एकिकडे शेतकऱ्यांच्या भाताला मातीमोल भाव तर व्यापाऱ्यांकडील तांदळाला सोन्याचा भाव अशी स्थिती आहे. या घडामोडींमुळे शेतकरी हवालदिल झाला असून भात खरेदीसाठी एकाधिकार
धान्य योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला. यामुळे भाताचे समाधानकारक पीक आले असून त्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. या परिस्थितीत भाताच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत प्रचंड घसरण झाल्याचे दिसते. भाताच्या भावात घसरण झाली असली तरी तांदळाच्या किंमती मात्र स्थिर असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाताचे विक्रमी उत्पादन होणाऱ्या या तालुक्यात त्यावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे मोठय़ा प्रमाणात आहेत.
गरी कोळपी या चवदार तांदळामुळे घोटीचा तांदूळ महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. भाताचे विक्रमी उत्पादन असल्याने घोटी शहरातील भात गिरण्यांची जागा हळूहळू भात मिलने घेतली. यामुळे भाताची खरेदी करणारा एक मोठा व्यापारी वर्ग घोटी शहरात निर्माण झाला. या व्यापाऱ्यांवर भाताच्या हमीभावाबाबत शासनाचा कोणताही अंकुश नसल्याने व्यापाऱ्यांच्या मर्जीने भाव ठरविला जात आहे. शासनाची तसेच खरेदी-विक्री संघ आणि आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या व्यापाऱ्यांनाच मातीमोल भावाने भाताची विक्री करावी लागत आहे. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला अंकुश घालण्यासाठी कोणी राजकीय पक्ष पुढाकार घेत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.
घोटी येथे शासनाने तातडीने एकाधिकार धान्य खरेदी योजना राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. कर्नाटक येथून येणाऱ्या मसुली व कर्नाटक या भाताला व्यापाऱ्यांची अधिक पसंती असल्याने स्थानिक भाताला दुय्यम स्थान दिले जाते. शासनाने एकाधिकार धान्य खरेदी योजनेतून भाताची खरेदी करावी तसेच आदिवासी विकास महामंडळाने भात खरेदी करावी याकरिता पाठपुरावा केला जात असल्याचे आ. निर्मला गावित यांनी सांगितले. शासनाने या प्रश्नात लक्ष न घातल्यास मनसे रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष रतनकुमार इचम यांनी दिला आहे.

भात आणि तांदळाच्या किंमतीतील तफावत
शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या भाताचे भाव आणि प्रक्रिया करुन व्यापारी विक्री करत असलेल्या तांदळाच्या भावातील तफावत पाहिल्यास या व्यवहारात कोणाची चांदी होत आहे हे लक्षात येते. भात खरेदी केल्यावर त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी प्रति क्विंटलला ३०० ते ४०० रूपये खर्च आहे. परंतु, भात व तांदुळाच्या किंमतीतील तफावत पाहिल्यास व्यापारी प्रचंड नफेखोरी करत असल्याचे स्पष्ट होते. भाताचा इंद्रायणी वाण (८० किलो) सध्या १४०० ते १५०० रूपये भावाने खरेदी केला जातो. प्रक्रिया केल्यावर त्याचा भाव मात्र प्रति क्विंटलला ३५०० रूपये आहे. होम थ्री वाण १४०० रुपये तर तांदूळ ३१०० रूपये, दप्तरी भात १४५० तर तांदूळ ३१०० रूपये, पूनम हळी भात ११०० रूपये तर तांदूळ २६०० रूपये. सुहासिनी भात ११०० रूपये तर तांदूळ ३५०० रूपये. गावठी हळी भात १००० तर तांदूळ २२०० रूपये, सोनम भात १३५० तर तांदूळ ३५०० रूपये असे भाव आहेत. हे भाव लक्षात घेतल्यास व्यापाऱ्यांकडून शेतकरी नाडले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. आवक वाढल्याने भाताची कमी भावाने खरेदी केली जात असली तरी तांदळाच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे, त्याचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना मिळत नसल्याचे दिसत आहे.

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर