शहरात बेसुमार वाढलेल्या बेकायदेशीर प्रवासी रिक्षांविरुध्द कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेप्रणीत अशा दोन रिक्षा संघटनांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयात रिक्षांसह घुसून धुडगूस घातला. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून आंदोलक रिक्षाचालकांवर सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांसह सुमारे १२५ रिक्षाचालकांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच ११३ रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.
सरस्वती चौकातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कार्यालय आहे. याच ठिकाणी सेवासदन कन्या प्रशाला आहे. दिवाळी सुट्टीनंतर मंगळवारी सकाळी शाळा नियमितपणे सुरू होत असताना लहान शाळकरी मुले-मुली शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बाहेर आले असतानाच रिक्षाचालकांनी वाहतूक शाखेसमोर सुमारे १२५ रिक्षा उभ्या करून ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा फटका शाळकरी मुलांना बसत होता. त्याचवेळी आंदोलकांनी गोंधळ घालत थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात घुसून धुडघूस घातला. त्यामुळे आणखी गोंधळ वाढला.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यावेळी भंगारात निघालेल्या रिक्षांविरुध्द कारवाईची मोहीम सुरूच असून मोहरम उत्सवातील पोलीस बंदोबस्तामुळे ही मोहीम शिथिल झाली खरी; परंतु ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी करणे कायदेशीरदृष्टय़ा अपेक्षित आहे. मात्र त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण रिक्षाचालक संघटनांचे नेते धनंजय शेवाळे (मनसे) व महिपती पवार (राष्ट्रवादी) यांनी सांगितले. त्यावेळी या कारवाईसाठी पुरेसे मनुष्यबळ पोलिसांकडून उपलब्ध करण्याची तयारी सहायक पोलीस आयुक्त बाहेती यांनी स्पष्ट केली. तेव्हा समाधानकारकपणे चर्चा झाल्यानंतर आंदोलकांचे नेते कार्यालयाच्या बाहेर येऊन रिक्षाचालकांना आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट करून आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला. तथापि रिक्षाचालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. उलट, नंतर गोंधळ आणखी वाढला. हा गोंधळ पाहून विशेषत: शाळा सुटल्यानंतर घराकडे परतण्यासाठी निघालेले शाळकरी विद्यार्थी कावरे-बावरे झाले. काही विद्यार्थी घाबरून रडू लागले. तेव्हा पोलिसांनी आंदोलकांना बेकायदेशीर जमाव न करता निघून जाण्याच्या सूचना दिल्या. त्याकडे दुर्लक्ष करून रिक्षाचालकांनी आणखी आक्रमक पवित्रा घेत गोंधळात जास्तच भर टाकली. त्यामुळे अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून सर्व आंदोलक रिक्षाचालकांना पांगविले व त्यांच्या ताब्यातील सर्व रिक्षा ताब्यात घेतल्या. आंदोलनाचे नेतृत्व करणारे धनंजय शेवाळे, महिपती पवार व भीमसिंह रजपूत यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुध्द पोलिसांना धक्काबुक्की करणे, त्यांची सरकारी वाहने रोखणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दंगल करणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण करणे आदी आरोपांखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.