निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या सर्वच पक्षांनी मतदारांशी थेट संपर्क साधण्यासाठी मोबाईलचा खुबीने वापर चालवला आहे. ‘एसएमएस’ तसेच रिंगटोनद्वारेही प्रचाराची आगळी पद्धत राबवली जात आहे. विशेष म्हणजे निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेला मोबाईल प्रचाराचा खर्च देणे टाळता येत असल्याने आता मोबाईलचा अधिक वापर करण्यावर सर्वच पक्षांनी चांगलाच भर दिला आहे.
सध्या उन्हाळ्याची तीव्रता चांगलीच वाढली असल्याने बाहेर फारशी वर्दळ नसते. सकाळीच महत्त्वाची कामे उरकून घेतली जातात. गरज असेल तरच बाहेर फिरणे वा प्रवास करणे सुरू आहे. एकीकडे हे चित्र असताना, निवडणूक प्रचाराच्या पातळीवर मात्र वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात असल्याचे दिसते. गेल्या पाच सहा वर्षांत सोशल नेटवर्कच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी जास्तच जोर दिला आहे. विशेषत: फेसबुकच्या माध्यमातून उमेदवारही जनतेपर्यंत पोहचत आहे. प्रमुख तीन उमेदवारांचे छायाचित्र देऊन कोणाला एकाला तरी लाईक करण्यासंबंधी सांगितले जात आहे. मोबईलद्वारा एसएमएसच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षाचे नेते पोहचत आहे. जाहीर सभेचा निरोप असो की कुठल्या मतदाराला मतदान करायचे या सर्व गोष्टीसाठी मोबाईलचा वापर केला जात आहे.नागपूर शहराचा वाढता परिसर बघता मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे तुलनेने दिवस कमी असल्याने उमेदवारांना वा त्यांच्या कार्यकर्त्यांनाही तसे शक्य नसल्याने निवडणुकीत आपल्या पक्षाची काय धोरणे आहेत, तसेच पक्षाचे प्रमुख नेते काय म्हणतात, या अर्थाचे मॅसेज प्रमुख कार्यकर्त्यांंमार्फत मतदारांना पाठविले जात आहेत. काँग्रेसने जाहीरनामा जाहीर केला. मात्र, भाजपचा जाहीरनामा अजून जाहीर झाला नाही. काँग्रेस सरकारच्या दहा वर्षांंच्या काळात देशातील भ्रष्टाचार आणि महागाई हे दोन प्रमुख मुद्दे घेऊन भाजप प्रचार करीत आहे. या दोन मुद्यावर सुद्धा एसएमएस देऊन लोकांना माहिती दिली जात आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या गाणी रिंगटोन म्हणून वाजविली जात आहे. स्टार प्रचारकांच्या भाषणातील काही मुद्देही ‘एसएमएस’द्वारा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे. मोबाईल, ‘एसएमएस’चा खर्च या यंत्रणेवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेलाही सिद्ध करता येत नसल्याने सध्या सर्वच राजकीय पक्षांचे सध्या तरी फावले आहे हे मात्र तितकेच खरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ringtone sms use for election campaign
First published on: 05-04-2014 at 03:18 IST