ग्राहक संरक्षण कायद्याला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘ग्राहक जागृती मास’ पाळण्यात येत असून त्याअंतर्गत १२ डिसेंबर रोजी नाशिक जिल्हा ग्राहक पंचायत आणि नवरचना ग्राहक मंडळ यांच्या वतीने शहरात १२ ठिकाणी ‘ग्राहक राजा जागा हो’ या पथनाटय़ाव्दारे जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला.
पथनाटय़ाच्या पहिल्या प्रयोगाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, महेश पाटील आदींच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी गमे यांनी नाशिक जिल्ह्य़ात शालेय ग्राहक मंडळांनी ग्राहक जागृतीत महत्वाचे योगदान दिले असल्याचा उल्लेख केला.
ग्राहक कायद्याच्या रौप्य महोत्सवानिमित्त जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात पथनाटय़ सादर करावीत त्यास शासन सहकार्य करेल, असेही ते म्हणाले. ‘ग्राहक राजा जागा हो’ हे पथनाटय़ नाशिक शहरात सीबीएस, बीवायके कॉलेज, पंचवटी कारंजा, ठक्कर बाजार या ठिकाणी झाले. तर समारोप आकाशवाणी टॉवरजवळील भाजीबाजार येथे झाला. समारोपास नगरसेविका सिमा हिरे, मुख्याध्यापक किशोर पालखेडकर, पुष्पा चोपडे, निर्मल अष्टपुत्रे, विलास देवळे आदी उपस्थित होते.