करवीरनगरीत रविवारी शाही दसरा थाटामाटात पार पडला. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी छत्रपती शाहूमहाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर नागरिकांनी सोने लुटण्याचा आनंद घेतला. तर नवरात्रीच्या नवव्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मीची ‘मयूरारूढ’ रूपामध्ये पूजा बांधण्यात आली.
    कोल्हापूरचा दसरा हा शाही दसरा म्हणून ओळखला जातो. छत्रपतींच्या घराण्यातील शाही परिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा परंपरेप्रमाणे पार पडतो. या सोहळय़ात सहभागी होण्यासाठी हजारो नागरिक सायंकाळी दसरा चौकात जमले होते. सूर्यास्ताच्या वेळी शमीपूजनाचा मुख्य विधी होत असतो. तत्पूर्वी दहा मिनिटे अगोदर शाही परिवाराचे दसरा चौकातील दगडी कमानीतून आगमन झाले. त्यांच्या मॅकबे या वाहनातून शाही परिवार दाखल झाला. छत्रपती शाहूमहाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे व त्यांचे सुपुत्र हे वाहनामध्ये विराजमान झाले होते. उपस्थित नागरिकांना अभिवादन करीत ते निशाण रोवलेल्या जागी आले. निशाणास फेरी मारल्यानंतर ते शाही परिवाराच्या बैठक व्यवस्थेकडे रवाना झाले. तेव्हा पोलीस बँडने संस्थान गीतावर सलामी दिली.    
सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी छत्रपती शाहूमहाराज यांनी आरती व पूजा करून शमीपूजन केले. त्यासाठी लकडकोटाची उभारणी करण्यात आली होती. छत्रपतींच्या हस्ते पूजन झाल्यानंतर जमलेले हजारो नागरिक सोने लुटण्यासाठी पुढे सरसावले. यानंतर शाहूमहाराजांनी उपस्थित मान्यवरांना अभिवादन करीत पुन्हा जागेवर स्थानापन्न झाले. याच ठिकाणी त्यांनी मान्यवरांकडून सोन्याचा स्वीकार केला. नंतर ते गाडीतून राजवाडय़ाकडे रवाना झाले. सायंकाळी सात वाजता भवानी मंडपात नागरिकांकडून सोने घेण्यासाठी पुन्हा दाखल झाले. तेथून करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. नदी परिसरातील समाधीचे दर्शन घेऊन ते पुन्हा राजवाडय़ाकडे रवाना झाले. दरम्यान, नवरात्रीच्या नवव्या दिवशी शहरात दुर्गामाता दौड काढण्यात आली. तिचा सांगता समारंभ शिवाजी चौक येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. तेथे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या वेळी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.    
विजयादशमीदिनी भवानी मंडपातील कमानीस हिल रायडर अँड हायकर्स ग्रुपच्या वतीने कलशाचे तोरण बांधण्यात आले. करवीरच्या शौर्यशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जुन्या राजवाडय़ाच्या कमानीची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधले गेले. या उपक्रमामध्ये योगदान देणारे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त परिणिता रानमाळे, युवराज साळोखे, मित्रप्रेम तरुण मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ चित्रकार जयसिंगराव दळवी, आमदार राजेश क्षीरसागर, उदय गायकवाड, सन्मती मिरजे, तहसीलदार गजानन गुरव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रमोद पाटील, सागर बकरे आदी उपस्थित होते.