विद्यार्थ्यांसह सर्वच वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालविण्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी व्यक्त केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय, ग्रामीण व शहर पोलीस विभाग यांच्या वतीने आयोजित २४ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या समारोपात ते बोलत होते. व्यासपीठावर विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत खरटमल, पोलीस उपायुक्त नंदकुमार चौघुले, परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक जिल्ह्य़ात सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा होणे आवश्यक आहे. अ वाहन चालकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने वर्षभर उपक्रम हाती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक उत्तम कांबळे यांनी वाहन चालविण्याचा परवाना देताना त्यांच्या अनेक चाचण्या घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. पोलीस उपायुक्त नंदकुमार चौघुले, डॉ. अनुराधा देशमुख यांचीही भाषणे झाली. प्रास्तविक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत खरटमल यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना तसेच एसटी महामंडळात २५ वर्षे विना अपघात सेवा करणारे वाहनचालक, २० वर्षे विना अपघात वाहन चालविणारे खासगी चालक यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.