* प्रत्येकी १० लाखांचा दंड
* माफीच्या साक्षीदारासह पाच जणांची सुटका
* अपहरण, कट रचणे, खून या तिन्ही गुन्ह्य़ांत जन्मठेप
* मोक्कामध्ये सात वर्षे सक्तमजुरी व पाच लाख दंड
पिंपरी येथील उद्योजक सतिंदर रामलाल सहानी यांचा मुलगा सागर याचे अपहरण करून आणि पंधरा लाख रुपयांची खंडणी दिल्यानंतरही त्याचा खून केल्याप्रकरणी विशेष मोक्का न्यायाधीश एस. पी. तावडे यांनी सहाजणांना जन्मठेप व प्रत्येकी दहा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात माफीच्या साक्षीदारासह पाच जणांची न्यायालयाने सुटका केली.
प्रसाद जगन्नाथ शेट्टी (वय ३२, रा. बडोदा, मूळ-कर्नाटक), छोटू ऊर्फ अरविंद विठ्ठलभाई चौधरी (वय ३६, रा. बडोदा), भिकूभाई दयाराम थानकी (वय ४६, रा. गुजरात), जितेंद्र शांतीलाल मोढा (वय ३९, रा. कासारवाडी, मूळ- गुजरात), छोटू घिसाइरवाला ऊर्फ रवितसिंग सविंदरसिंग भदोरिया (रा. आग्रा) आणि नितीन शांतिलाल मोढा (रा. कासारवाडी) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. तर माफीचा साक्षीदार झालेले नारायण गोविंदभाई जमेरिया (वय ४६, रा. गुजरात) यांची न्यायालयाने मुक्तता केली. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विकास शहा यांनी ५७ साक्षीदार तपासले. यात व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्या दोन अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली होती.
सरकारी वकील शहा यांनी शुक्रवारी हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचा युक्तिवाद करत आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. ‘‘आरोपींनी पैसे मिळविण्यासाठी हा कट रचला होता. १५ लाख रुपये खंडणी दिल्यानंतरही सागर सहानीचा अत्यंत क्रूरपणे खून करून मृतदेह जंगलात टाकून दिला होता. अपहरण केल्यानंतर सागरने पळून जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. तरीही त्याचा खून करण्यात आला. ही घटना समाजावर आघात करणारी होती. खंडणीसाठी अपहरणाच्या घटना घडू नयेत व गुन्हेगारांवर जबर बसावी म्हणून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,’’ अशी मागणी शहा यांनी केली. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे काही दाखले पाहिल्यानंतर हा खटला दुर्मिळातील दुर्मिळ ठरत नसल्याचे सांगत सहा जणांस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
‘या गुन्ह्य़ाचा सर्व पुरावा हा परिस्थतीजन्य होता. सागरचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी दोन वेळा त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आरोपी हे खोटय़ा नावांनी हॉटेलमध्ये राहिले होते. त्याच्या नोंदी पोलिसांनी पुरावा म्हणून सादर केल्या आहेत. ही माहिती माफीच्या साक्षीदाराने सांगितली आहे. माफीच्या साक्षीदाराने दिलेला जबाब व पोलिसांनी गोळा केलेले पुरावे यांचा संबंध जुळतो,’ असे निकालात म्हटले आहे. निर्दोष सोडण्यात आलेले आरोपी हा मोटारचालक असून, त्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा नसल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
खुनाची घटना
सागर सहानी (वय २२) हा १४ ऑगस्ट २००५ रोजी कासारवाडी येथील मोटार अॅण्ड डेकोर हे दुकान बंद करून आपल्या मोटारीने घरी जात होता. पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात हॉटेलमधून खाण्याचे पार्सल घेऊन जात असताना आरोपींनी सागरचे त्याच्या कारसह अपहरण केले होते. सतिंदर यांना फोन करून दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास मुलाचे हात-पाय तोडून त्याचे पार्सल पाठवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सागरला बडोदा, चोटीला व गुजरात येथे ठेवले होते. आरोपीजवळील पैसे संपल्यामुळे त्यांनी सागरजवळील रोख २४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. सागरच्या वडिलांना वारंवार पैशासाठी फोन करून शेवटी तडजोडीने पंधरा लाख रुपये घेऊन सागरला सोडून देण्याचे मान्य केले. त्यानुसार आरोपी कुन्नी यांच्याकडे हवालामार्फत खंडणीचे पैसे पाठविले. खंडणीची रक्कम मिळताच जमारिया याला सांगितले. २५ ऑगस्ट रोजी छोटू, जगमलसिंग व रजपूत यांनी गुजरातमधील कापराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सागरचा गळा कापून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सागरचा मृतदेह नाशिक-वापी मार्गावरील जंगलात टाकून दिला होता.
माफीच्या साक्षीदाराचे म्हणणे..
‘‘घटना घडल्यापासून खूप घाबरलो होतो. आपल्याकडून चुकीची घटना घडली असे वाटत होते. त्यामुळे सत्याचा रस्ता धरावा असे वाटत होते. त्यातून या खटल्यास माफीचा साक्षीदार होण्याचे ठरविले. माफीचे साक्षीदार होण्याचे ठरविल्यानंतर आरोपींनी न्यायालयात आल्यानंतर धमक्या दिल्या होत्या. या खटल्यात न्यायालयात जबाब दिल्यानंतर मनाला शांतता मिळाली. कमविण्याचे वय गेल्यामुळे आता या पुढे गुजरातमध्ये घरी जाऊन भजन-कीर्तन करत राहणार आहे. आपल्याला दोन मुले आहेत. न्यायालयाने निर्दोष सोडल्यामुळे खूप आनंद होत आहे. गेली सात वर्षे तीन महिने येरवडा कारागृहात होतो. त्यातील पाच वर्षे अतिसुरक्षित अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आरोपींचा हा पहिलाच गुन्हा होता. पण त्यांनी केलेल्या कृत्याला झालेली शिक्षा ही योग्य आहे.’’
सागरचे वडील म्हणतात..
‘‘या निकालावर आपण समाधनी नाही. या गुन्ह्य़ातील नितीन मोढा, प्रसाद शेट्टी आणि जितेंद्र मोढा या तिघांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा होती. पण झालेली ही शिक्षा सुद्धा कमी नसून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार जन्मठेप म्हणजे आयुष्यभर तुरुंगात राहवे, असे आहे. सरकारी वकिलांशी चर्चा करून या निर्णयाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात जायचे का, हे ठरविण्यात येईल’’