उत्तराखंडात मदत कार्य करणाऱ्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत प्राण गमवावे लागलेल्या शहीद जवान गणेश हनुमंत अहिरराव यांचे पार्थिव विमानाने मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येथे विमानतळावर आणण्यात आले. तिरंगा ध्वजाच्या आवरणात लपेटलेल्या अहिरराव यांना विमानतळावर या वेळी पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली.
उत्तराखंडात गौरीकुंड परिसरात नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांच्या अंत्यविधीचे सामान घेऊन मदत कार्यास गेलेल्या अहिरराव यांच्यासह इतरांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत प्राणोत्क्रमण झाले. शहीद जवान अहिरराव (वडाळा-वडाळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव) यांचे पार्थिव इंडियन एअरलाईन्सच्या विमानाने औरंगाबाद विमानतळावर त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी आणण्यात आले. पार्थिवासोबत चुलत बंधू बाळासाहेब व कांतीलाल अहिरराव होते. शहीद गणेश हे गाजियाबाद येथील सैन्यदलाच्या एनडीआरएफ ८ बटालियनमध्ये कार्यरत होते.
मुख्यमंत्र्यांच्या वतीने शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, प्रशासनातर्फे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, पोलीस आयुक्त संजय कुमार, ग्रामीण पोलीस अधीक्षक इशू सिंधू, जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन एम. बी. कुलकर्णी आदींनी तिरंगा ध्वजाच्या आवरणाने लपेटलेल्या शवपेटीतील अहिरराव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. पुणे येथील ५ एनडीआरएफचे कमाडंट अलोक अवस्थी त्यांच्या २० सहकारी जवानांसह अहिरराव यांच्या गावी होणाऱ्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारास सज्ज होते. पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे, विमानतळ प्रमुख वसंत बर्डे, सामाजिक कार्यकर्ते सुनील अग्रवाल, विमानतळ मुख्य परीक्षा अधिकारी एम. लकडा आदींची या वेळी उपस्थिती होती.
आदरांजली अर्पण केल्यानंतर अहिरराव यांचे पार्थिव चाळीसगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून वडाळा-वडाळी गावाकडे रवाना करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
शहीद जवान अहिरराव यांना विमानतळावर मानवंदना
उत्तराखंडात मदत कार्य करणाऱ्या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेत प्राण गमवावे लागलेल्या शहीद जवान गणेश हनुमंत अहिरराव यांचे पार्थिव विमानाने मंगळवारी आणण्यात आले. तिरंगा ध्वजाच्या आवरणात लपेटलेल्या अहिरराव यांना विमानतळावर या वेळी पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली.

First published on: 03-07-2013 at 01:59 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salute to martyr soldier ahirrao on airport