कळंब तालुक्यातील कसबे तडवळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत थांबले होते, त्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला जावा व रेल्वेस्थानकास त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी भिकुजी इदाते यांनी केली.
समरसता साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित सोळाव्या सामाजिक समरसता साहित्य संमेलनाचा समारोप झाला, त्या वेळी इदाते बोलत होते. संमेलनाध्यक्ष प्रा. शेषराव मोरे, डॉ. अशोकराव कुकडे, रमेश पतंगे, विश्वास गांगुर्डे, डॉ. श्याम घोणसे, उमाकांत होनराव, संजय कांबळे, रमेश महाजन यांची उपस्थिती होती. इदाते म्हणाले की, १९२८मध्ये महात्मा फुले यांना आपल्या घरातील पाण्याचा हौद दलितांसाठी खुला करावा लागला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत डॉ. आंबेडकरांना चवदार तळय़ाचा सत्याग्रह करावा लागला. आता जबाबदारी आपल्या पिढीची आहे, प्रश्न सोडविण्यासाठी सर्वानी कृती करण्याची गरज आहे.
संमेलनाध्यक्ष मोरे म्हणाले की, अशा साहित्य संमेलनातून देशात घडत असलेल्या परिवर्तनाची दखल घेतली जावी. समाजात वेगाने परिवर्तन घडत आहे. जाती-पातीच्या िभती गळून पडत आहेत. प्रचंड मोठी सामाजिक क्रांती होत आहे. याची दखल घेणारे साहित्य अजून निर्माण झाले नाही. आगामी काळात ते निर्माण करून बहुजन समाजापर्यंत होणारा बदल नीट समजावून सांगितला पाहिजे. धर्मग्रंथ, पूजापाठ हे व्यक्तिगत स्तरावर पाळले जातील. सामाजिक स्तरावर देशाला पहिले प्राधान्य सर्वत्र दिले जाते, हा बदल महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.
रमेश पतंगे यांनी समरसता साहित्य संमेलनाची कल्पना ज्या दामुअण्णा दाते यांनी मांडली, त्यांच्या नावाने पुढील अधिवेशनापासून वैचारिक लिखाण करणाऱ्या साहित्यिकास २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार असल्याचे जाहीर केले. विश्वास गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. उमाकांत होनराव यांनी आभार मानले.