भारतीय आकाशवाणीने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या शास्त्रीय गायन स्पर्धेत नगरची सानिका अनंत गोरेगावकर देशात पहिली आली. या क्षेत्रातील प्रतिष्ठेची म्हणूनच ही स्पर्धा ओळखली जाते. ख्यातकिर्त ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित विकास कशाळकर यांच्याकडे तिचे शास्त्रीय गायनाचे अध्ययन सुरू आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी पुणे येथे झाली. या फेरीत ४० स्पर्धक होते. त्यातील सानिकासह दोघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या फेरीत तिने हमीर राग गायला. दिल्ली येथे झालेल्या अंतिम फेरीत सानिकाने रायसा कानडा रागातील विलंबित ख्याल सादर करत राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला.
या यशामुळे आकाशवाणीची बी-ग्रेड तिला मिळाली आहे. नगर येथील स्वरानंद प्रबोधिनीची ती विद्यार्थिनी असून सध्या तिची संगीत विशारद परिक्षेची तयारी सुरू आहे. यापूर्वी बारामती, सांगली, पुणे व मुंबई येथील विविध स्पर्धामध्ये सानिकाने पारितोषिके मिळवली आहेत. प्रबोधिनीचे संचालक डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांनी सानिकाचे खास अभिनंदन केले असून तिच्यासह डॉ. धनश्री खरवंडीकर, वैदेही काळे यांना स्वरानंद भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नव्या वर्षांत दि. १० जानेवारीला या पुरस्काराचे वितरण होणार आहे.