वाईत आज अवतरला सांताक्लॉज.. आज त्याचे संपूर्ण शहरभर रस्त्यारस्त्यावर आणि चौकाचौकांत बच्चेकंपनीसह थोरामोठय़ांनीही उत्साहात स्वागत केले. दरवर्षी येणाऱ्या या सांताक्लॉजची सर्वानीच उत्सुकतेने वाट पाहिली.
वाई शहरातही मागील २७ वर्षांपासून दरवर्षी ख्रिसमसच्या दिवशी एक सांताक्लॉज शहरात प्रकट होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत शहरभर फिरतो. लहानथोर त्याची वाट पाहात असतात. सर्वाना तो खाऊचे वाटप करतो. कधी उपयुक्त वस्तू देतो. सांताक्लॉजच्या वेशभूषेत असणारा हा सांताक्लॉज सर्वाना आशीर्वाद देतो. हा अवलिया आहे अरविंद दत्तात्रय ऊर्फ बंडू कोठावळे.
संत निकोलस, फादर ख्रिसमस ऊर्फ सांताक्लॉज दरवर्षी ख्रिसमसच्या आदल्या दिवशी दि. २४ डिसेंबरला प्रगट होऊन मुलांना खेळणी आणि खाऊ देऊन ख्रिसमसची सुरुवात होते. याच उत्साहाने व परमेश्वराचे प्रेषित होण्यातील एक वेगळा अनुभव म्हणून बंडू कोठावळे वाईत सांताक्लॉजची वेशभूषा करून लहान मुलांमध्ये रमतात आणि शांततेचा संदेश देतात.
अरविंद कोठावळे सांगतात, परमेश्वराकडे धर्म, पंथ, जात हा भेद नाही. चांगल्या कामासाठी तो नेहमीच चांगली माणसे निवडतो. मीही गेली २७ वर्षे हा उपक्रम राबवत आहे.
येथील ब्राह्मणशाहीत राहणारे अरविंद ऊर्फ बंडू कोठावळे धर्माने हिंदू असूनही सांताक्लॉजचा आनंद देतात. वाईचे ग्रामदैवत श्री धुंडी विनायक मंदिरात दर्शन घेऊन वाईतील चर्च, मिशन वस्तीसह शहरातील सर्व जातिधर्माच्या गल्लीत जातात आणि लोक त्यांचे आनंदाने स्वागत करतात.
सुरुवातीला चौकाचौकांतून यथाशक्ती उपक्रम राबविला. काही वेळा लोक टिंगलटवाळी करीत. कोणी विदूषक म्हणत, तर कोणी बहुरूपी जोकर म्हणत. परंतु कशाचाही विचार न करता हा उपक्रम राबवायचा, हा निर्धार गेली २५ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
वाईत अवतरला सांताक्लॉज!
वाईत आज अवतरला सांताक्लॉज.. आज त्याचे संपूर्ण शहरभर रस्त्यारस्त्यावर आणि चौकाचौकांत बच्चेकंपनीसह थोरामोठय़ांनीही उत्साहात स्वागत केले. दरवर्षी येणाऱ्या या सांताक्लॉजची सर्वानीच उत्सुकतेने वाट पाहिली. वाई शहरातही मागील २७ वर्षांपासून दरवर्षी ख्रिसमसच्या दिवशी एक सांताक्लॉज शहरात प्रकट होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत शहरभर फिरतो.

First published on: 25-12-2012 at 09:33 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santa claus arrive in wai