मुंबईतील पश्चिम व पूर्व उपनगरांना जोडणारा सांताक्रूझ- चेंबूर जोडरस्ता प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असताना या रस्त्यावरून थेट विद्याविहार स्थानकापर्यंत जाणारा रामदेवी पीर मार्गाचा दीड किलोमीटरचा रस्ता झोपडय़ांच्या अडथळय़ात रखडला आहे. एरवी कुर्ला ते विद्याविहार हे अंतर कापायला गर्दीच्या वेळी जवळपास अर्धा तास लागतो. पण हा रस्ता पूर्ण झाल्यास अवघ्या पाच-सात मिनिटांत हे अंतर कापता येणार आहे. मात्र, झोपडय़ा हटवण्याचे आव्हान पालिकेला अद्याप पेललेले नाही. पेलण्यात पालिका असमर्थ ठरत असल्याचे चित्र असून या झोपडय़ांनी हा प्रकल्प रोखून धरला आहे.
सध्या कुर्ला स्थानकापासून विद्याविहार पश्चिम स्थानकापर्यंत जायचे झाल्यास कुर्ला डेपो-कमानी-प्रीमियम रोड-विद्याविहार असा प्रवास करावा लागतो. त्यासाठी जवळपास तीन मिनिटे लागतात. हा रस्ता झाल्यास कुर्ला स्थानक-बुद्ध कॉलनी-ब्राह्मणवाडी नाला आणि विद्याविहार स्थानक असा प्रवास होईल. एलबीएस मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. कुर्ला ते विद्याविहार पश्चिमेला जोडणारा हा १५५० मीटर लांबीचा आणि ६० फूट रूंदीचा हा रस्ता आहे. पैकी ६५० मीटर लांबीचा मार्ग नाल्यावरून जातो. ९८ कोटी ४० लाख रुपये खर्च यासाठी अपेक्षित आहे. त्यासाठी २०१० मध्ये रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. पण आता तीन वर्षे उलटून गेली तरी रस्ता कागदावरच आहे.
या रस्त्याच्या मार्गात जवळपास ३८३ झोपडय़ांचा अडथळा आहे. प्रकल्पबाधित झोपडय़ा हटवणे पालिकेला आजवर शक्य झालेले नाही, असे कुल्र्यातील अथक सेवा संघाचे अनिल गलगली यांनी सांगितले. तसेच पालिकेकडे अर्ज केल्यावर प्रकल्पाचे काम सुरू आहे. तीन वर्षे उलटली तरी त्याच खर्चात काम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगण्यात येते. पण पालिकेच्या उदासीनतेमुळे आणि स्थानिक राजकारणामुळे हा प्रकल्प रखडल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santacruz chembur link road vidyavihar to kurla within five minutes
First published on: 20-02-2014 at 02:43 IST