नाशिकच्या गोदाकाठी तयार झालेल्या सनईचा सूर बनारसच्या गंगाघाटावर पोहोचल्यानंतर ज्येष्ठ सनईवादक दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या जादूई स्पर्शाने या सनईच्या सूरांचा गोडवा अधिकच वाढला. या सूरांनी कधीच सीमेची बंधने ओलांडली. खाँसाहेबांच्या नावासह नाशिकच्या सनईचे नावही गाजत राहिले, आणि गाजत राहिले ही सनई तयार करणाऱ्या दुर्गादास दामोदर ठाकूर यांचे नाव. सनईने संपूर्ण जीवन भारावलेल्या ठाकूर यांच्या ‘सनई माझी जीवनसाधना’ या आत्मचरित्राचे प्रकाशन  रविवारी सकाळी १०.३० वाजता येथे होणार आहे.
गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमास मुंबई आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक गोपाळ अवटी, ज्येष्ठ उद्योजक देवकिसन सारडा, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर दसककर, ज्येष्ठ सनई वादक पंडित शैलेश भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
केवळ सूरांच्या साथीने रसिकांच्या मनावर गारूड करणाऱ्या उस्ताद बिस्मिल्ला खॉं आणि सनई यांचे नाते कला प्रेमींना नवखे नाही. मात्र ज्या सनईवर उस्तादांची बोटे नजाकतीने फिरत ती सनई नाशिकचे सनईवादक दुर्गादास ठाकूर यांच्या परिश्रमातून तयार झालेली होती. दुर्गादास म्हणजेच कलाप्रेमींचे ‘दादा’ व खॉंसाहेब यांचे नाते खरेदीदार व विक्रेता अशा स्वरूपाचे कधीच नव्हते. नात्यातील औपचारिकता लोप पावून एकमेकांच्या सूरांतील ओढीने त्यांचे सूर आजन्म जुळून आले. या विषयी बोलतांना दादांनी सांगितले, एका कलाकाराच्या जीवनात किती उत्कट प्रसंग आले तरी त्याने किती नम्र व सकारात्मक राहिले पाहिजे, याचा प्रत्यय उस्तादांकडे पाहून येत असे. उस्तांदासह अनेक मान्यवरांचा सहवास मला सनईमुळे लाभला. यातील काही प्रसंग पुस्तकरूपाने सर्वासमोर येत आहेत. माझ्या हातातून तयार झालेली सनई तर त्यांनी वापरलीच पण आपल्या हातांची ‘तस्बी’ म्हणजे जपमाळ मिळावी म्हणून ते सतत आग्रही राहिले. खाँसाहेबांच्या सान्निध्यात असतांना अनेक अविस्मरणीय प्रसंगाची खूणगाठ मनाशी बांधली गेल्याचे दादा सांगतात.
१९८२ मध्ये नाशिक जिल्हा सांस्कृतिक संघटनेच्या निमित्ताने खाँसाहेबांच्या भेटीचा योग जुळून आला. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार होते. या कार्यक्रमासाठी दादांनी खास दोन सनया त्यांच्या सूरानुसार तयार करून ठेवल्या. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री ११ वाजता आयोजकांमधील काही मंडळी दादांच्या घरी आले. खॉंसाहेब तुमची आठवण काढत आहेत. लगोलग भेटायला चला, असे म्हणून लागले. मी त्यांना दुसऱ्या दिवशी येण्याचे कबूल केले. खाँसाहेबांनी माझी आठवण करावी याचे आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी खाँसाहेबांचे शिष्य शैलेश भागवत यांच्या समवेत मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस त्यांनी स्वागत करत आमच्याशी गप्पा मारल्या. मी दुकानात येण्याचे दिलेले निमंत्रणही त्यांनी मोठय़ा आनंदाने स्वीकारले. दुकानात आल्यावर आमच्यात एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. त्यांनी मला ‘बेटा दुर्गादास’ म्हणून संबोधले व मी त्यांना ‘बाबाजी’ म्हणायला सुरूवात केली. त्यांनी मला ‘तस्बी’ बनविण्यास सांगितले. मी त्यांना सहज विचारले, ‘आपको त्सबी बनाकर दुंगा तो जब आप उसका इस्तेमाल करेंगे तो मालिकसे कुछ दुवाएं मुझे भी मिलेगी? ’ त्यावर खॉंसाहेब म्हणाले होते, ‘हां, हां, क्यो नही मिलेगी?’ याचा प्रत्यंतर मला नंतरच्या काळात जवळुन आला असल्याचे दादांनी नमूद केले.
उत्तरप्रदेश येथील प्रतापगढ या ठिकाणी होणाऱ्या संगीत महोत्सवास दादा आणि शैलेश भागवत दोघेही जाणार होते. त्यावेळी प्रवासातील काही वेळ ते खाँसाहेबांना देणार होते. त्यावेळी ठरल्याप्रमाणे खाँसाहेबांची भेट झाली.
सर्वाची विचारपूस करत दोघेही पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. गाडी काही क्षणात सुटणार, तेवढय़ात खाँसाहेबांचा नातू धापा टाकत खिडकी जवळ आला. हातात प्रत्येकी २०० रुपये देत त्याने सांगितले, ‘आपके जानेके बाद बाबाजी बोले, लडके आये थे और वैसेही चले गये. बच्चोंको मैने कुछ दिया नही, और मुझे यह पैसे दिये और बोले, जा दोडकर अभी गाडी छूटी नही होगी. उनको दे आ’ बाबाजींचे आमच्यावरील प्रेम पाहून आम्हा दोघांच्याही डोळ्यांत अश्रु
उभे राहिले. असेच एकदा खाँ साहेबांच्या हस्ते पुण्यातील दगडूशेठ गणपतीची आरती होणार असतांना माणसांच्या गर्दीत कोपऱ्यामध्ये उभ्या असलेल्या दादांना खॉं साहेबांनी व्यासपीठावर बोलावून घेतले होते. यांसारख्या अनेक प्रसंगांचा उल्लेख या पुस्तकात आहे.