उत्तराखंडात झालेला प्रकोप मानवनिर्मित की निसर्गनिर्मित असा प्रश्न करून अंधेरी येथील एम. व्ही. एम. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फुलांच्या सजावटीतून ‘निसर्ग वाचवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा’ हा संदेश दिला. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुष्पोत्सव’ महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्तराखंड येथील प्रकोपाचे विदारक चित्र साकारले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शांतीलाल शाह यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्षे वेगवेगळ्या विषयांवर हा पुष्पोत्सव आयोजित करण्यात येतो. उद्योगपती नवीन माहेश्वरी यांच्या हस्ते पुष्पोत्सवाचे उद्घाटन झाले. या पुष्पोत्सवासाठी छायाचित्रकार घनश्याम भडेकर व पत्रकार निलिमा जांगडा यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी विविध फुलांच्या सजावटीतून ‘पृथ्वीवर अतिक्रमण करू नका, पृथ्वी वाचवा’ असेही सांगितले. या पुष्पोत्सवात माध्यमिक शाळेचे दोन संघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे २३ संघ आणि पदवी विभागाचे ७ संघ सहभागी झाले होते. एकूण १४ संघाना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रिया देसाई यांनी केले तर पर्यवेक्षिका माधुरी नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास हिरालाल रिटा, रणछोड पटेल, संजीव मंत्री, अमृत निसार, डॉ. इंदू सालियन, संतोष तिवारी, मनोहर कुंभेजकर आदी मान्यवर उपस्थित होते.