सुरक्षा रक्षक घोटाळ्यात सज्जड पुरावे देऊनही प्रशासन या घोटाळ्याची चौकशी करण्यास तयार नाही. उलट निर्ढावलेल्या प्रशासनाने उर्वरित सुरक्षा रक्षक उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान खानपान पुरविण्यासाठी परस्पर एका भोजन कंत्राटदाराची नियुक्ती केल्याचे उघडकीस आले आहे. या कंत्राटदाराला आगाऊ पाच लाख रुपये देऊन कामही सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या कंत्राटदाराची निविदा सगळ्यात कमी दराच्या निविदेपेक्षा सुमारे ४० टक्के जादा दर असूनही प्रशासनाने त्याच्यावर मेहेरनजर केली आहे. सगळ्यात कहर म्हणजे स्थायी समितीने या कंत्राटदाराला कंत्राट देऊ नये, असे स्पष्ट बजावलेले असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत हा सगळा व्यवहार केला आहे.
सुरक्षा रक्षकांच्या ९६८ पदांसाठी मे २०१३ भरती करण्यात आली. या प्रक्रियेत उमेदवारांनी केलेला अर्ज आणि अधिकाऱ्यांची भरलेला चाचणी अहवाल यात तफावत आढळून आली होती. सभागृह नेते यशोधर फणसे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी या भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याचे कागदोपत्री पुरावे सादर केले. मात्र फक्त अहवालातील चौघांना बाद करून प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केलीच नाही. या भरतीमध्ये घोटाळा झालाच नाही असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
आता प्रशासनाने भांडूप संकुल, गोरेगावचे एसआरपी प्रशिक्षण केंद्र, ठाण्यातील पोखरण येथील लष्करी प्रशिक्षण केंद्र आणि तळेगाव येथील एनडीआरएफच्या तळावर या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. येथे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांच्या भोजनासाठी कंत्राटदार नियुक्तीसाठी तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. पहिल्या वेळी केवळ एकच निविदा आली. दुसऱ्या वेळीही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तिसऱ्या निविदा प्रक्रियेत चार जणांनी निविदा सादर केल्या होत्या. सर्वात कमी दर भरणाऱ्या ‘सचिन कॅटर्स अ‍ॅण्ड डेकोरेटर्स’कडे उपहारगृहविषयक प्रमाणपत्र नसल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने ‘सत्कार कॅटर्स’ला हा ठेका देण्याचे निश्चित केले. वास्तविक पालिकेच्या मालमत्तेमधील उपहारगृहासाठी कंत्राटदाराला प्रशासनानेच हे प्रमाणपत्र द्यावयाचे असते. मात्र आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हे कंत्राट देण्यासाठी प्रशासन आग्रही आहे. प्रशासनाने स्थायी समितीच्या तीन बैठकांमध्ये हा प्रस्ताव सादर केला होता. परंतु स्थायी समितीने त्यास अद्यापही मंजुरी दिलेली नाही. मात्र तरीही प्रशासनाने चारही प्रशिक्षण केंद्रातील उपहारगृहाचा ताबा सत्कार कॅटर्सला दिला आहे. प्रशासनाकडून पाच लाख रुपये घेऊन कंत्राटदाराने प्रशिक्षणार्थी सुरक्षा रक्षकांना भोजन पुरविण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराबाबत स्थायी समिती अंधारातच आहे.
गेले वर्षभर भांडूप कॉम्प्लेक्स येथे उपहारगृह चालविणाऱ्या ‘सचिन कॅटर्स’ने प्रतिदिन, प्रति सुरक्षा रक्षक १८० रुपयांमध्ये भोजन देण्याची तयारी दाखविली होती. मात्र २५० रुपयांमध्ये भोजन देणाऱ्या ‘सत्कार कॅटर्स’ला हे कंत्राट देण्याचा निर्णय सुरक्षा रक्षक अधिकारी आणि प्रशासनाने घेतला आहे. भांडूप संकुल ही पालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे ‘सचिन कॅटर्स’ला परवाना आणि हे कंत्राट द्यावे, असा आदेश स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिला. मात्र प्रशासनाकडून उत्तर मिळू न शकल्याने शेवाळे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.