अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या बसने ठोकरल्यामुळे एका शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. शहरातील विजापूर रस्त्यावर सोरेगाव येथे सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे संतप्त जमावाने अपघातग्रस्त बस पेटवून दिली.
सोरेगाव येथील व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थी वाहतुकीची बस (एमएच १३ एझेड ०४५५) विद्यार्थ्यांना घेऊन सोरेगाव येथून सोलापूरकडे येत असताना सोरेगाव् येथे हॉटेल नागेशसमोर सदर बसने एका शाळकरी विद्यार्थ्याला ठोकरले. राहुल भरप्पा म्हेत्रे (वय १६, रा. सोरेगाव, सोलापूर) असे या दुर्दैवी मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नजीकच्या आतार नगर येथे शिकवणीसाठी निघाला होता. वाटेत नागेश हॉटेलसमोर रस्ता ओलांडण्यासाठी थांबला असताना भरधाव बसने त्यास धडक दिली. अपघातानंतर बस चालकाने बस जागेवर सोडून पलायन केले. त्या वेळी या घटनेमुळे संतप्त झालेल्या २० ते २५ जणांच्या जमावाने बसवर हल्ला चढविला. बसमधील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून नंतर बसला आग लावण्यात आली. यात बस संपूर्णत जळाली असून १२ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अपघातानंतर बस जाळण्याची शहरातील गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी देगाव येथे सांगली येथील जैन श्रावकांना घेऊन जाणा-या बसला किरकोळ अपघात झाला होता. त्या वेळी स्थानिक जमावाने सदर बस पेटवून दिली होती.
दरम्यान, सोरेगाव येथील राहुल म्हेत्रे याच्या अपघाती मृत्यूप्रकरणी बसचालकाविरुद्ध मल्लिकार्जुन अण्णप्पा म्हेत्रे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. तर, जळीत बसचा क्लीनर नागेश इरण्णा परीट याने बस जाळल्याप्रकरणी अज्ञात जमावाविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए.व्ही.पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2013 रोजी प्रकाशित
शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू; संतप्त जमावाने बस पेटविली
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या बसने ठोकरल्यामुळे एका शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. शहरातील विजापूर रस्त्यावर सोरेगाव येथे सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे संतप्त जमावाने अपघातग्रस्त बस पेटवून दिली.
First published on: 04-09-2013 at 02:01 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School student died in collision of bus