शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती गुपचुप करण्याचा डाव सरकार खेळत असले तरी माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी साईभक्तांना सजग केल्याने मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल केले जात आहेत. काँग्रेसच्या प्रभावशाली नेत्यांनी आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी शिफारशी केल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक राजकीय नेत्यांचे स्वत:ची, कुटुंबातील सदस्याची किंवा कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत.
 साईबाबा संस्थानवर वर्णी लावण्यासाठी यापुर्वीही काँग्रेस पक्षाच्या हायकमांडकडून नाव आणले जाण्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत. मागील विश्वस्त मंडळात अशा प्रकारे काही विश्वस्त हायकमांडकडून आले होते.आता देखील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जशा शिफारशी केल्या आहेत, त्याचप्रमाणे दिल्लीतील काँग्रेसचे प्रभावशाली नेते अहमद पटेल यांनीही काही नावाची शिफारस केली आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी नांदेड येथील दिलीप कंदकुंदरे यांचे नावाची शिफारस केली आहे. कंदकुंदरे यांचे कुटुंब साईभक्त आहे. संस्थानला आंध्र प्रदेशातून तांदूळ खरेदी करतांना पूर्वी ते मदत करत असत. त्यांनी एका साई मंदिराचेही निर्माण केले आहे. शिंदे यांनी पूर्वी उर्मिला जाधव यांची संस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक केली होती. आता त्यांनी पुण्यातील त्यांच्या एका निकटवर्तीयाचे नाव सुचवले आहे.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कुटुंबातून तीन अर्ज सरकारकडे करण्यात आले आहेत. विखे, त्यांच्या पत्नी शालिनीताई, चिरंजीव डॉ. सुजय यांचा त्यामध्ये सामावेश आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी डॉ. नामदेव गुंजाळ यांचे एकमेव नाव सुचविले आहे. शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व त्यांच्या पत्नी सरस्वती यांनीही अर्ज केले आहेत. विखे यांनी आपल्या अनेक समर्थकांना अर्ज करायला लावले आहेत. राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसोबत एक अर्जाचा नमुना जोडला होता. न्यायालयाने १५ दिवसात विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्याचा आदेश दिला. पण विश्वस्तपदासाठी साईभक्तांकडून अर्ज मागविले नव्हते. गुपचूप नियुक्ती करण्याचा डाव खेळण्यात आला. पण माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते संजय काळे यांनी साईभक्तांमध्ये जागृती घडवून आणली. अनेकांना अर्ज करावयास सांगितले. त्यांच्यामुळे शेकडो अर्ज विधी व न्याय विभागाकडे दाखल झाले आहेत.
शिर्डी शहरातून सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये कैलासबापू कोते, सुमित्रा कोते, विलास कोते, विजय कोते यांच्यासह ५० जणांनी अर्ज केले आहेत.
काळेंमुळे कोटीचा फायदा
माहिती अधिकाराचे कार्यकर्ते संजय काळे यांनी संस्थानमधील अनेक गैरप्रकारावर आवाज उठविला. त्यामुळे गेल्या ५ वर्षांत दीड कोटीपेक्षा अधिक फायदा संस्थानला झाला. विश्वस्तांना मोठय़ा रकमा त्यांचा माहितीचा अर्ज जाताच भराव्या लागल्या होत्या, तर तिघा विश्वस्तांविरुध्द गुन्हे नोंदविले गेले. आता विश्वस्तांची निवड पारदर्शक व्हावी म्हणून काळे यांनी साईभक्तांना मोठय़ा प्रमाणात अर्ज करायला लावले आहेत.