सार्वजनिक क्षेत्रात केवळ महिलांसाठी बँक सुरू करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली. या घोषणेचा फारसा तपशील त्यांनी दिला नाही. परंतु या घोषणेवर महिलांनी अतिशय विचक्षण प्रतिक्रिया दिल्या.
सार्वजनिक शौचालयांसारख्या समस्या सोडवा!
सार्वजनिक क्षेत्रात महिलांसाठी बँक करण्याची योजना सरकारला अचानक कशी काय सुचली? विशेष बँकेची गरज काय? सध्याच्या बँकांत महिला व पुरुषांना वेगवेगळी वागणूक मिळते का? अशी घोषणा करून महिलांना नेमका काय फायदा करून दिला जाणार आहे? सध्यातरी या घोषणेवरून महिला आणि पुरूष असा भेदभाव केल्याचेच दिसत आहे. ज्या महिलांना लहान-मोठय़ा कर्जाची गरज असेल, त्यांना या योजनेचा फायदा होऊ शकेल. परंतु केवळ ‘महिलांसाठी महिलांनी चालविलेली’ बँक काढून उपयोग काय? त्या पेक्षा सार्वजनिक शौचालयांसारखे महिलांना दैनंदिन जीवनात भेडसावणारे आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या समस्यांसाठी काहीतरी योजना सरकारने जाहीर कराव्यात.
– लीना अभ्यंकर,
 रिजनल मार्केटिंग मॅनेजर, वेस्टर्न रिजन (झी लर्न लिमिडेट-किड्झी)
 ग्रामीण महिलांसाठी संधी
महिलांचा बँकिंग क्षेत्रातील सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने सरकारने केलेली ही घोषणा म्हणजे चांगले पाऊल म्हणावे लागेल. परंतु त्याचा फायदा खरोखरीच महिलांना होईल का, हे येणारा काळ ठरवेल. वास्तविक सध्याच्या पुढारलेल्या समाजात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असा भेद करणेच मुळात चुकीचे आहे. शहरातील महिलांवर या घोषणेचा फारसा प्रभाव पडणार नाही. मात्र ग्रामीण भागातील महिलांसाठी ही चांगली संधी ठरू शकते. त्यांना बँकिंग क्षेत्राची अधिक माहिती होऊ शकेल. व्यक्तिगत पातळीवर या महिलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. अथक परिश्रम करूनही हाती पैसा येत नाही वा आला तरी नवऱ्याकडून हिसकावून घेतला जातो. परंतु ‘महिलांनी महिलांसाठी चालविलेली बँक’ असे जर या बँकेचे स्वरूप असेल तर या महिलांना नक्कीच दिलासा आहे.
-डॉ. माधवी इंदप
(प्रोफेसर इमेरिटीज्)
नुसतीच घोषणा ठरू नये
सार्वजनिक क्षेत्रात महिलांसाठी विशेष बँक सुरू करण्याची सरकारने केलेली घोषणा ही नक्कीच विशेष गोष्ट आहे. मात्र त्याचे फायदे तळागाळापर्यंतच्या महिलांपर्यंत खरोखरीच पोहोचणार असतील, तर ठीक आहे. अन्यथा आपले सरकार कसे महिलांचे कैवारी आहे हे दाखविण्यासाठी वा आपली प्रतिमा जपण्यासाठी जर सरकारने ही घोषणा केली असेल, तर अन्य घोषणांप्रमाणे ही घोषणाही काही दिवसांतच हवेत विरून जाईल.
– डॉ. मंजिरी भालेराव
(पुरातत्त्व तज्ज्ञ)
महिलासाठी नवीन क्षेत्र सुरू होईल
महिलांसाठी बँक सुरू करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अशी बँक सुरू  झालीच तर महिलांसाठी एका नवीन क्षेत्राची दालने खुली होतील. जिथे त्या आपली क्षमता सिध्द करू शकतील. या बँकेमध्ये महिलांसाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध आहेत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
-लीना पालशेतकर,
 प्राध्यापिका
दीर्घकालीन चांगल्या परिणामांची अपेक्षा
या बँकेमुळे महिलांसाठी रोजगार निर्माण होणार असेल आणि महिला खातेदार वाढवण्याच्या दृष्टीने काही फायदा होणार असेल तर निश्चितच या योजनेचे दीर्घकालीन चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. शिवाय, या बँकेच्या मदतीने केवळ महिलांच्या आर्थिक समस्या, आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ असणाऱ्या महिलांसाठी मदत आणि महिला उद्योजिका किंवा व्यावसायिकांसाठीच्या योजना निर्माण करता येऊ शकतील. या बँकेची प्रगती, वाटचाल ही सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकाप्रमाणेच असायला हवी ही एक अपेक्षा आहे. आणि दुसरे म्हणजे आता महिलांसाठी बँक झाली म्हणजे त्यांनी तिथेच गुंतवणूक करावी, असा दुराग्रहही समाजामध्ये निर्माण होणार नाही, याचे भान राखले गेले पाहिजे.
– ललिता जोशी,
(संयुक्त सचिव – बँक कर्मचारी संघटना)
महिलांमधील क्षमता सिद्ध होईल
महिलांसाठीची बँक ही आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात चांगली घोषणा आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपल्याकडे इंदिरा सहकारी बँक नावाची एकच महिलांसाठीची बँक होती. आत्तापर्यंत एखादी शाखा महिलांनी चालवलेली आहे. मात्र, संपूर्ण बँकेचा कारभार चालवण्याची संधी महिलांना कधी उपलब्ध झाली नव्हती. महिला स्वतंत्रपणे एखादी आर्थिक संस्था चालवू शकतील एवढी बौध्दिक क्षमता त्यांच्यात नक्कीच आहे. त्यामुळे सरकारने खरोखरच अशी बँक सुरू केली तर महिलांना एक चांगली संधी मिळू शकेल. महिला बँक चालवणार असतील तर नक्कीच विविध स्तरावरील महिलांना बचतखाते, कर्ज, वित्तपुरवठा यात सामावून घेता येईल.
    -अनुश्री दीक्षित,
    (बँक अधिकारी)