छत्तीसगडमधील बस्तर भागात काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर झालेल्या नक्षलवादी हल्ल्यानंतर नागपुरातील दूरदर्शन केंद्र आणि आकाशवाणी केंद्राच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आजवरच्या हल्ल्याची पाश्र्वभूमी पाहता नक्षल्यांचे मुख्य लक्ष्य आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रे आहेत. छत्तीसगडमधील जगदलपूर येथील दूरदर्शन केंद्र आणि आकाशवाणी या केंद्रावर काही दिवसांपूर्वी नक्षल्यांनी हल्ला करून बॉम्बस्फोट घडवून आणला. याची गंभीर दखल केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाने दखल घेतली आहे.
नक्षलवादी फ्रंट ऑर्गनायझेशनचा नागपूर हा एक अड्डा असून ते आश्रयस्थान आहे. नागपूर आकाशवाणी केंद्राला केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या दक्षता विभागाच्यावतीने एक पत्र मिळाले आहे. जगदलपूर येथे झालेल्या नक्षली हल्ल्याची पुनरावृत्ती न होण्याच्या उद्देशाने आकाशवाणी केंद्राच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, तसेच केंद्रात प्रवेश करताना प्रथम गाडय़ांची तपासणी करण्यात यावी, तपासणी झाल्याशिवाय गाडय़ांना आत प्रवेश देण्यात येऊ नये, असे पत्रात म्हटले आहे.
सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या दक्षता विभागाच्या सूचनेनुसार नागपूर शहर पोलिसांना नागपूर आकाशवाणी केंद्राला सुरक्षा पुरविण्यात यावी असे पत्र आकाशवाणीच्यावतीने देण्यात आल्याचे समजते. खेडय़ांवर ताबा मिळवून शहरे ताब्यात घेण्याची नक्षल्यांची रणनीती असून शेवटच्या टप्प्यातील नक्षल्यांचे आंदोलन सुरू झाल्यामुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय नेतेसुद्धा नक्षल्यांच्या हिटलिस्टवर आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर दोन दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला. यात प्रदेश प्रमुख नंदकुमार पटेल आणि सलवा जुडूमचे प्रणेते महेंद्र कर्मा यांच्यासह २७ जण मारले गेले होते.