संजीवनी कारखान्यास शंकरराव कोल्हे यांचे नाव

आपण विरोधी पक्षात आहोत असे सांगून तालुक्याचे लोकप्रतिनिधी गेली नऊ वर्षे स्वत:च्या निष्क्रियतेवर पांघरूण घालत आहेत. गोदावरी कालव्यासाठी त्यांनी आतापर्यंत एक थेंबही नवीन पाण्याची निर्मिती केली नाही.

आपण विरोधी पक्षात आहोत असे सांगून तालुक्याचे लोकप्रतिनिधी गेली नऊ वर्षे स्वत:च्या निष्क्रियतेवर पांघरूण घालत आहेत. गोदावरी कालव्यासाठी त्यांनी आतापर्यंत एक थेंबही नवीन पाण्याची निर्मिती केली नाही. त्यांच्यामध्येच पाणी न राहिल्याने कोपरगाव तालुका पाण्यापासून वंचित झाल्याची टीका संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.
संजीवनी साखर कारखान्याच्या ५१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोल्हे बोलत होते. कारखान्यास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे नाव द्यावे असा ठराव या सभेत प्रतापराव वाबळे, मुक्ता पाटील पानगव्हाणे, भगीरथ शिंदे, एल. डी. पानगव्हाणे यांनी मांडला. सभासदांनी हात उंचावून त्याला मंजुरी दिली, त्यास माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी विरोध केला होता. परंतु सभासदांच्या रेटय़ापुढे त्यांनाही माघार घ्यावी लागली व आयत्या वेळी आलेला विषय टाळय़ांच्या गजरात मंजूर झाला. विषयपत्रिकेवरील तेरा विषयही बहुमताने मंजूर करण्यात आले.
बिपीन कोल्हे म्हणाले, तालुक्यासाठी माजी मंत्री कोल्हे यांनी काहीच केले नाही अशी विरोधक वारंवार टीका करीत आहेत, मात्र १९९० ते २००४ या काळात त्यांनी मुकणे, वालदेवी, काश्यपी व गौतमी ही चार धरणे ५०० कोटी रुपयांचा निधी आणून पूर्ण केली व त्यातून गोदावरी कालव्यांना कमी पडणारे ८.६५ टीएमसी पाणी वाढविले. मात्र गेल्या ९ वर्षांत तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना पाण्यासाठी काहीही करता आले नाही. शंकरराव कोल्हे व माजी खासदार (स्व.) शंकरराव काळे पाण्याच्या प्रश्नावर एकत्रित लढले त्यामुळेच आपण तग धरून आहोत. भविष्यातदेखील या प्रश्नावर नकारात्मक भूमिका घेऊन आम्हाला आडवे न येता सामूहिक प्रयत्नाने हा लढा चालू राहिला तरच पाणी मिळेल अन्यथा गोदावरी कालवे आठमाहीसुद्धा राहणार नाही असा इशारा कोल्हे यांनी दिला.
कार्यकारी संचालक बाळासाहेब शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तालुक्याला सर्वाधिक १२ कोटी २८ लाख पीकविमा मिळवून दिल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, तहसीलदार राहुल जाधव तसेच माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांच्या वतीने ज्येष्ठ संचालक बाजीराव वरकड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक विश्वासराव महाले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विलासराव वाबळे यांनी आभार मानले.    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shankarrao kolhe name to sanjivani sugar factory

ताज्या बातम्या