गुजरातमधील दंगलीत एका खासदाराला जाळून मारण्यात आले. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भेट द्यायलाही गेले नाहीत. असे हे मोदी आता देशाचे नेतृत्व काय करणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी वणी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. गारपीट व अवकाळी पावसाच्या संकटानंतर ग्रामीण भागात प्रचारार्थ होणारी ही पहिलीच सभा होती. नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये उमटलेल्या नाराजीचे प्रत्यंतर या वेळी दिसून आले. अपेक्षेपेक्षा खूपच कमी गर्दी या सभेस होती.
या वेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, आ. ए. टी. पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होती. सभेची वेळ भर दुपारची असल्याने टळटळीत उन्हाचा उपस्थितांना त्रास होऊ नये म्हणून सभा मंडप टाकण्याची दक्षता काँग्रेस आघाडीने घेतली. दोन ते तीन आठवडय़ांपूर्वी ग्रामीण भागात गारपीट व अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त केली. शेतकरी वर्ग त्या विवंचनेत असल्याने या भागात नेहमीच्या उत्साहात राजकीय पक्ष प्रचारही टाळत आहे. सर्वपक्षीय उमेदवारांकडून सांत्वन करुन शांततेत प्रचाराचे धोरण अवलंबिले गेले असताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात होणारी ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे इतर पक्षांचेही लक्ष होते. पवार यांचे आगमन होईपर्यंत सुन्या वाटणाऱ्या मंडपात त्यानंतर गर्दी होऊ लागली. मंडप कसाबसा भरल्यावर स्थानिक नेत्यांनी मोकळा श्वास घेतला.
भाषणात शरद पवार यांचा ‘मोदी एके मोदी’ हाच अध्याय पुढे सुरू राहिला. भाजपने पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे नाव निश्चित केले. त्याचीही पवार यांनी खिल्ली उडविली. वास्तविक पंतप्रधान निवडण्याआधी खासदार निवडला जातो. कशात काही नसताना भाजपने मोदींचे नाव या पदासाठी जाहीर केले. आता तेदेखील पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहात असल्याचा टोला पवार यांनी लगावला. पंतप्रधानपदी विराजमान होणारी व्यक्ती जनतेच्या अडचणी समजावून त्या सोडविणारी असली पाहिजे. गुजरात दंगलीतील संदर्भ देत त्यांनी मोदींच्या बेजबाबदार कार्यशैलीकडे लक्ष वेधले. गुजरात भूकंपाच्या वेळी तेथील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्रात मदत फेऱ्या काढण्यात आल्या होत्या. परंतु, गतवर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यावर गुजरात शासनाने विपरीत कृती केली. गुजरातमधील कंपन्यांनी जनावरांच्या छावणीसाठी पुरविलेल्या पशुखाद्यावरून तेथीस शासनाने त्या कंपन्यांवर कारवाई केल्याचे पवार यांनी सांगितले. पालकमंत्री भुजबळ यांनीही नारपार नदीवर गुजरात राज्यात बांधण्यात येणाऱ्या जरी प्रकल्पास विरोध दर्शविला. महाराष्ट्रातील पाणी गुजरातला जाऊ दिले जाणार नाही. महाराष्ट्र शासनाने गुजरातला पाणी उचलण्याची परवानगी कशी दिली, याची छाननी करण्याची मागणीही त्यांनी केली.