कलायात्रिक व नाटय़जल्लोष यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. ५ व ६ला नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रवीण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
मागच्याच वर्षी सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेला त्याचवेळी जिल्ह्य़ात भरघोस प्रतिसाद मिळाला. स्पर्धक संघांसाठी संयोजकांच्या वतीने स्पर्धेपूर्वी खास प्रशिक्षण शिबिर घेण्यात येते. गेल्या दि. २९ ला डॉ. आंबेडकर स्मारकात हे शिबिर झाले. अनेक संघांचे कलाकार या शिबिरात सहभागी झाले होते. नाटय़शास्त्राचे अभ्यासक हेमंत गवळे व लेखक-दिग्दर्शक अमित बैचे यांनी नाटय़लेखनापासून ते सादरीकरणापर्यंतच्या विविध अंगांचे मार्गदर्शन या शिबिरात केले.
नगर शहर व जिल्ह्य़ातील नामवंत कलाकारांच्या वतीने व त्यांच्या नावाने या स्पर्धेतील विविध पारितोषिके दिली जातात. हेच या स्पर्धेचे वैशिष्टय़ आहे. त्यांची प्रेरणा नव्या कलाकरांनी घ्यावी हा त्यामागचा हेतू आहे. शाहू मोडक, रघुनाथ क्षीरसागर, मधुकर तथा मामा तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, अनिल क्षीरसागर, सुधाकर निसळ, दत्तोपंत अडगटला, डॉ. श्रीराम रानडे, श्रीनिवास भणगे, मिलिंद शिंदे, पेंटर श्रीगोंदेकर, रूस्तुमकाका हाथीदारू, वसुधा गंधे (देशपांडे), मीना सासणे यांचा त्यात समावेश आहे.
नगरचेच प्रसिध्द रंगकर्मी प्रकाश धोत्रे या स्पर्धेचे ब्रँन्ड अँम्बेसडर आहेत. यंदा डॉ. सतिश साळुंके (औरंगाबाद) व अभिजित झुंजारराव (मुंबई) हे या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. स्पर्धेच्या संयोजनासाठी सर्वश्री प्रसाद बेडेकर, शैलेश मोडक, रितेश साळुंके, अमित खताळ, विलास बडवे, अमोल खोले आदी प्रयत्नशील आहेत. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेला नाटय़प्रेमींनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.