मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदूवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे आदर्श आहेत, अशी भावना ‘एनडीए’तील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आत्मजकुमार भट याने बुधवारी व्यक्त केली. भारताचा एक शूर शिपाई व्हावे हीच माझी इच्छा आहे, असेही तो म्हणाला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२३ व्या तुकडीतील स्नातकांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आली. सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भोजराज शाक्य याला नौदलप्रमुख करंडक, आत्मजकुमार भट याला लष्करप्रमुख करंडक तर, प्रमोद सिंह याला अ‍ॅडमिरल सुरेश मेहता करंडक प्रदान करण्यात आला. आपल्या मुलाचे कौतुक पाहण्यासाठी त्यांचे आई-वडील आणि नातेवाईक या पदवीप्रदान कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित
होते.
कर्नाटकातील मंगलोर हे मूळगाव असलेल्या आत्मजकुमार भट याचा जन्म मिरज येथे झाला. त्याचे वडील संतोषकुमार भट हे डॉक्टर. तर, आई अंजना भट या गृहिणी. आईने प्रेरणा दिली म्हणून घरामध्ये कोणताही लष्कराची पाश्र्वभूमी नसतानाही मी ‘एनडीए’मध्ये दाखल झालो, असे आत्मजकुमार याने सांगितले. लष्करामध्येच कारकीर्द घडवायची हे ध्येय डोळ्यासमोर असल्यामुळे मी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमध्ये जानेवारी महिन्यात दाखल होणार असल्याचे त्याने सांगितले. आत्मजचे पणजोबा हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डॉक्टर म्हणून युद्धभूमीवर गेले होते, अशी आठवण डॉ. संतोषकुमार भट यांनी सांगितली. आत्मजच्या मेहनतीला फळ आल्याची भावना अंजना भट यांनी व्यक्त केली.
भोजपाल शाक्य हा मध्य प्रदेशातील इंदूरचा. त्याचे वडील भगीरथ हे मिलिटरी स्कूलमध्ये पीटी शिक्षक आहेत. तर, आई वैकुंठीदेवी या गृहिणी आहेत. कठोर परिश्रम आणि घरच्यांचे पाठबळ यामुळे यश मिळाल्याचे सांगून भोजपाल यानेही डेहराडून येथेच पुढील प्रशिक्षण घेणार असल्याचे सांगितले.
प्रमोद सिंह हा भोपाळचा. त्याचे वडील गोरख सिंह हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदार तर आई प्रभादेवी सिंह या गृहिणी आहेत. देशसेवा करण्याच्या उद्देशातूनच लष्करामध्ये येण्याचे ठरविले असून भविष्यात नौदलामध्ये काम करायचे असल्याचे प्रमोद सिंह याने सांगितले.