शिवसेना नेते आमदार दिवाकर रावते यांनी मंगळवारी मुंबई येथे कोल्हापुरातील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अस्थिकलश सोपवला. उद्या बुधवारी प्रायव्हेट हायस्कूल येथे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर रोजी देहावसन झाले. तर सोमवारी अस्थिविसर्जन कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातील सर्व जिल्हय़ांमध्ये अस्थिकलश पाठविण्याचे नियोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतर रावते यांनी कोल्हापुरातील जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्याकडे अस्थिकलश सोपवला. हा अस्थिकलश घेऊन सर्व प्रमुख कार्यकर्ते सायंकाळी मुंबईहून कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. अस्थिकलश दर्शनाची सोय प्रायव्हेट हायस्कूल येथे करण्यात आली आहे, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.