० धुळ्यात अस्थिकलश यात्रा
० उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र श्रद्धांजली सभा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्थिकलशाचे मंगळवारी जिल्ह्यात आगमन झाले असून गुरूवारी दिवसभर तो शिवसेनेच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. धुळे शहरात बुधवारी शिवसेनाप्रमुखांच्या अस्थिकलशाची यात्रा काढण्यात येणार आहे. दुसरीकडे शहर-परिसरासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेसह विविध सामाजिक संस्था व राजकीय पक्षांच्यावतीने श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.
नाशिकचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर व ग्रामीणचे जिल्हाप्रमुख जयंत दिंडे हे मुंबईतून शिवसेनाप्रमुखांचा अस्थिकलश घेऊन मंगळवारी नाशिक जिल्ह्यात दाखल झाले. नाशिकच्या हद्दीत प्रवेश करतानाच शिवसैनिकांच्या आग्रहास्तव इगतपुरी घोटी परिसरात काही कालावधीसाठी अस्थिकलश दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आला. त्यानंतर परिसरातून अस्थिकलश यात्रा काढण्यात आली. बुधवारी सकाळी आठ ते अकरा दरम्यान नाशिकरोड येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सिन्नर व त्र्यंबकेश्वर येथे अस्थिकलश यात्रा जाईल. गुरूवारी दिवसभर हा अस्थिकलश शालिमारच्या शिवसेना कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नंतर त्याचे विधीवत पूजन करून गोदेत विर्सजन केले जाणार असल्याची माहिती करंजकर यांनी दिली. याप्रसंगी पक्षातील वरिष्ठ मंडळी उपस्थित राहणार आहेत. धुळे येथे बुधवारी सकाळी दहा वाजता अस्थिकलशाची यात्रा काढण्यात येणार आहे. शिवाजी पुतळ्यापासून यात्रेची सुरूवात होणार असून ती नंतर गांधी पुतळा, सुभाष पुतळा महानगर कार्यालय येथे थांबेल. सायंकाळी पाच वाजेपासून अस्थिकलश बुधवारी रात्रभर शिवसेनेच्या प्रबोधनकार ठाकरे जिल्हा कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी नऊ वाजता अस्थिकलश कुसुंबा येथील राममंदिर चौकात, अकरा वाजता नेर गांधी चौक, दुपारी एकला साक्री तर सायंकाळी पाच वाजता पिंपळनेर येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी नऊला अस्थिकलश देवभाने फाटा येथे, नंतर सोनगीर, नरडाणा, शिरपूर, दोंडाईचा व शिंदखेडा येथे दर्शनासाठी ठेवला जाणार आहे. सायंकाळी पाच वाजता मुडावद येथे पांझरा व तापी नदीच्या संगमावर विधीवत पूजन करून त्याचे विसर्जन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, आ. प्रा. शरद पाटील यांनी दिली.
दरम्यान, नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी सिडको येथे पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांच्यातर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल व दत्ता गायकवाड, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, मामा ठाकरे, विष्णू पवार, प्रभाग सभापती कल्पना पांडे आदी उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बडगुजर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखविले. संघटनेच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हा शिवसेनाप्रमुखांचा कधीच उद्देश नव्हता. राजकारणात ते सक्रीय असले तरी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणावर त्यांनी भर दिला. मराठी माणसांचे अस्तित्व टिकले पाहिजे या एकमेव उद्देशाने त्यांनी आयुष्यभर लढा दिला. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतरही त्यांच्या विचारांची साथ न सोडता शिवसेनेची ताकद वाढविणे हीच बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली ठरेल, असे आवाहन मान्यवरांनी केले.
माजी जिल्हाप्रमुख गायकवाड यांनी सत्तेपासून दुर राहत शिवसैनिकांना पदे देण्यात बाळासाहेबांचा खरा आनंद होता. युतीची राज्यात पहिल्यांदा सत्ता आल्यावर त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता मुख्यमंत्रीपद मनोहर जोशी यांना दिले असे सांगत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. एकजुटीने शिवसेनेची ताकद वाढविणे हीच बाळासाहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे सुनिल बागूल यांनी सांगितले.भारतीय विमा कर्मचारी सेना (एल.आय.सी) नाशिक विभागातर्फे ‘जीवन प्रकाश’ आयुर्विमा विभागीय कार्यालयाच्यावतीने शिवसेनाप्रमुखांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. नाशिक विभागाचे वरीष्ठ मंडल प्रबंधक एस. बी. जोशी यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जोशी यांच्यासह सी.आर.एम के. राजीवन नायर यांची श्रध्दांजलीपर भाषणे झाली. सूत्रसंचालन भरत तेजाळे यांनी केले. दलित मुस्लीम क्रांती मंचच्यावतीने शिवसेनाप्रमुखांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थापक अध्यक्ष शाम गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत कार्याध्यक्ष अझहर अहमद, अ‍ॅड. अय्युब पठाण, अ‍ॅड शमीर इनामदार, पवन जाधव, धर्मराज भालसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.