‘स्वाईन फ्लू’वर अत्यंत रामबाण असलेल्या ‘टॅमी फ्लू’ औषधांच्या बाबतीत आरोग्य विभाग एकदुसऱ्याकडे बोट दाखवण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ झालेल्या रुग्णांना खासगी औषधी दुकानातून ‘टॅमी फ्लू’ विकत घेऊन औषधोपचार करावा लागत आहे.
नागपूर शहरातील मेडिकल, मेयो व महापालिकेच्या रुग्णालयांकडे पाच हजार ‘टॅमी फ्लू’ होत्या. यातील दोन हजार ‘टॅमी फ्लू’ एकटय़ा मेडिकलमध्ये होत्या. ३० ऑगस्टला या गोळ्यांची मुदत संपली. त्यामुळे या गोळ्या कालबाह्य़ झाल्या. परंतु या गोळ्या मेडिकलला शासनाकडून मिळाल्या नाहीत. दरम्यान, याच कालावधीत मेडिकलमध्ये ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण येऊ लागले. रुग्णालयात ‘टॅमी फ्लू’ नसल्याने त्या बाहेरून खरेदी करून आणावी लागत आहे. शासनाच्या गळचेपी धोरणामुळे गरीब रुग्णांना आर्थिक भरूदड सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. जे.बी. हेडाऊ म्हणाले. याप्रकरणी आरोग्य उपसंचालकाकडे ‘टॅमी फ्लू’ गोळ्यांची मागणी करण्यात आली. परंतु या बाबीला एक महिना उलटून गेल्यानंतरही त्या उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे मेडिकलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना नाईलाजास्तव खासगी दुकानातून ‘टॅमी फ्लू’ विकत घेण्यास सांगण्यात येत आहे. आरोग्य उपचंसचालक डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, आमच्याकडे मागणीचे पत्र आल्यानंतर आरोग्य संचालकांना ही बाब कळवण्यात आली. ‘टॅमी फ्लू’ खरेदीचे प्रकरण मुंबईस्तरावर सुरू आहे. मेडिकलच्या अधिष्ठात्यांना ५० हजार रुपयांपर्यंतच्या औषधी व साहित्य खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे या अधिकाराचा वापर करून ‘टॅमी फ्लू’ खरेदी करावेत आणि रुग्णांना उपलब्ध करून द्यावेत, असे सांगून आरोग्य उपसंचालकांनी आपले बोट मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडे दाखवले. शासकीय रुग्णालयांमध्ये नसल्या तरी खासगी औषधी दुकानात व शहरातील काही औषध एजन्सीकडे ‘टॅमी फ्लू’चा भरपूर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांना औषधे मिळत नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. पुढील आठवडय़ात ‘टॅमी फ्लू’आल्यानंतर मेडिकलला पाठवण्यात येणार असल्याचेही डॉ. जयस्वाल यांनी सांगितले.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. सध्या प्रभारी अधिष्ठाता म्हणून चर्मरोग व छातीरोग विभागप्रमुख डॉ. आर.पी. सिंग हे कारभार बघत आहेत. त्यांना औषधे व साहित्य खरेदी करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे मेडिकलमध्ये ‘टॅमी फ्लू’ येऊ शकली नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत डॉ. आर.पी. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. गेल्या एक महिन्यात ‘स्वाईन फ्लू’चे सहा रुग्ण आढळून आले आहेत. सध्या मेडिकलमध्ये चार रुग्ण दाखल असून त्यातील दोघांना ‘स्वाईन फ्लू’ झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. या रुग्णांना ३८० रुपये किंमत असलेले दहा गोळ्या असलेले ‘टॅमी फ्लू’ खरेदी करावे लागत आहेत. एका रुग्णाला एक पॉकेट दोन दिवस पुरते. रुग्णालयात ‘टॅमी फ्लू’ नसल्याने स्वाईन फ्लूच्या रुग्णांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of tamiflu drugs in nagpur
First published on: 11-09-2014 at 08:19 IST