श्रीराम मंदिर संस्थानचे आद्य गादीपती तथा खांदेशच्या वारकरी संप्रदायाचे थोर संत श्री अप्पा महाराज यांनी जळगावात श्रीराम रथोत्सव व त्यानिमित्त वाहनोत्सव तसेच आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ते क्षेत्र पंढरपूर अशा पायी दिंडी पालखीची सुरूवात १४० वर्षांपूर्वी केली होती. तेव्हापासून ही उत्सव यात्रा आजतागायात अखंडपणे सुरू आहे.
सालाबादाप्रमाणे कार्तिकी एकादशीच्या दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी श्रीराम रथोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाची सुरूवात दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदेपासून झाली. त्यात घोडा, हत्ती, वाघ, सिंह, श्री सरस्वती, श्री शेषनाग, चंद्र, सूर्यनारायण, गरूडराज मारूती अशी वाहने १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान शहरातून निघतील. तर २४ रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे संस्थानचे विद्यमान गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी सांगितले. उत्सवांतर्गत २५ नोव्हेंबर रोजी रास क्रीडा वाहन, २६ तारखेला फुलांचा महादेव, तुलसी विवाह व २८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेस अन्नसंतर्पवाने उत्सवाची सांगता होणार आहे.