शिक्षण विभागाकडून उर्दू शिक्षकांची भरती होत नसल्यामुळे जिल्ह्य़ातील उर्दू शाळा बंद होऊ लागल्या आहेत. याकडे लक्ष देऊन त्वरित उर्दू शिक्षक भरती केली नाही तर शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा उर्दू साहित्य परिषदेने दिला आहे.
जिल्ह्य़ातील अन्य सामाजिक संघटना, तसेच अनेक पालकही या आंदोलनात सहभागी होतील, असे परिषदेचे सचिव आबीद दुलेखान यांनी सांगितले. जिल्ह्य़ात उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये तब्बल ३० ते ३५  शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे आहे या शाळांमध्ये एकच शिक्षक संपूर्ण शाळा सांभाळतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. सालवडगाव, राहुरी फॅक्टरी, भेंडा, गोणेगाव, सोनई, कणगर, दाढ येथे उर्दू शाळांवर एकच शिक्षक असून शिर्डी, दहीफळ, शेवगाव, जामखेड, अकोले येथे उर्दू शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, अशी माहिती दुलेखान यांनी दिली.
गेली तीन वर्षे शिक्षण विभागाने उर्दू शिक्षकांची भरतीच केलेली नाही. आंतरजिल्हा बदली धोरणांतर्गत जिल्ह्य़ाबाहेर कार्यरत असलेले काही उर्दू शिक्षक जिल्ह्य़ात येऊ इच्छितात, मात्र प्रशासनच त्यांच्या मार्गात विविध तांत्रिक अडथळे आणत आहे. त्यांना ना हरकत प्रमाणपत्र मिळू दिले जात नाही, ते सध्या ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या ठिकाणाहून त्यांना येऊ दिले जात नाही, जिल्ह्य़ातून त्यासाठी काही प्रयत्न केले जात नाहीत. लवकर शिक्षक मिळाले नाहीत तर जिल्ह्य़ातील उर्दू शाळा आता बंद पडतील, त्यात अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, असे दुलेखान यांनी सांगितले.
ही सर्व स्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने त्वरित यातील अडचणी दूर कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र उर्दू बचाव समिती, राज्य उर्दू शिक्षक संघटना, मायनॉरिटी फोरम, उर्दू फौंडेशन या संघटनांनी केली असल्याची माहिती दुलेखान, तसेच अब्दुलाह चौधरी, मुसा शेख, रईस रज्जाक, सय्यद अस्लम, मोहंमद रफिक शेख, बाबा शेख, निसार कुरेशी आदींनी दिली.