हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम पाहणारे संगमनेरचे सुपुत्र श्याम जाजू यांची भाजपच्या कार्यकारिणीत महासचिव म्हणून निवड करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिल्लीत रविवारी केलेल्या त्यांच्या निवडीनंतर संगमनेरमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकारिणीत वर्णी लागलेले जाजू जिल्ह्यातील एकमेव नेते आहेत.
    राजनाथ सिंह यांनी रविवारी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. राजनाथ सिंह यांनी जाजू यांच्या कामावर विश्वास दाखवत ही निवड केली. जाजू यांच्या निवडीचे वृत्त येथे येताच पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. गेल्या पंधरा वर्षांपासून जाजू दिल्लीत पक्षाचे काम पाहात आहे. जाजू यांच्या निवडीने संगमनेरला बहुमान मिळाला असून संगमनेरचे नाव दिल्लीत पोहोचले आहे. त्यांच्या निवडीनंतर संगमनेरकरांनी त्यांच्याशी संपर्क साधून अभिनंदन केले आहे.