तंबाखू व सुगंधित सुपारीच्या विक्रीवर अन्न व औषधी विभागाच्या वतीने बंदी घालण्यात आल्याच्या निषेधार्थ उद्या (बुधवारी) फेरीवाले संघातर्फे शहरात मूकमोर्चाचे आयोजन केले आहे. सरकारच्या निर्णयामुळे एक कोटी लोकांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अध्यादेशाविरोधात निघणाऱ्या मोर्चात औरंगाबाद होलसेल व रिटेल सुपारी-तंबाखू व्यापारी संघ, पानटपरीधारक मोठय़ा संख्येने सहभागी होणार आहेत.
सिगारेट, विडी, देशी-विदेशी दारू शरीराला अपायकारक नाहीत काय? त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही, असा सवाल उपस्थित करीत सुगंधित तंबाखू आणि सुगंधित सुपारीवरच घातलेली बंदी अन्यायकारक असल्याचे मोहम्मद सरफोद्दीन सिद्दीकी यांनी या संदर्भात पत्रकात म्हटले आहे. सकाळी ११ वाजता पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मूकमोर्चा निघणार आहे. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन होलसेल संघाचे अध्यक्ष विकास साहूजी व मोहम्मद सरफोद्दीन सिद्धीकी यांनी केले आहे.