तालुक्यातील करंदी येथील मळगंगा देवीच्या मंदिरातील ४ किलो चांदीचा ऐवज अज्ञात चोरटयांनी काल (सोमवार) मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला. बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे अडीच लाख असून या चोरीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
करंदी येथे मळगंगा मातेचे पौराणिक देवस्थान आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांची जागृत देवस्थान म्हणुन त्यावर अपार श्रद्घा आहे.
मध्यरात्री सभामंडपाच्या बाजूच्या दरवाजाने चोरटय़ांनी मंडपात प्रवेश केला. प्रथम गाभाऱ्याच्या लोखंडी दरवाजाचे व नंतर लाकडी दरवाजाचे कुलूप कटवाणीने तोडून त्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला़  मळगंगा मातेच्या डोक्यावर लावण्यात आलेली चांदीची छत्री, त्याचे चांदीचेच पाट चोरटय़ांनी काढून घेतले. मूर्तीभोवती चांदीचे मखर होते, तेही चोरटयांनी लांबवले.  
आज सकाळी पुजारी अरूण एकवीरे काही भाविकांसह मंदिरात गेले असता गाभाऱ्याचे दार उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाहता पाहता ही गोष्ट गावभर पसरली. काही वेळातच ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. पारनेर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल शिवरकर यांनी तेथे तातडीने कुमक पाठविली. नगरचे श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचरण करण्यात आल्यानंतर श्वानाने मंदिरापासून पाचशे मिटरपर्यत माग काढला. ठसे तज्ञांना गाभाऱ्यातील गणपतीच्या फोटोवर तसेच बल्बवर काही ठसे आढळून आले असून त्यांनी ते तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
मंदिरास १९५३ मध्ये सयाजी कोंडाजी गोरे यांनी गाभाऱ्याच्या मंडपास चांदीची मखर अर्पण केले होते.  सन ७२-७३ मध्ये सुमारास करंदीच्याच परंतु मुंबईत वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी देवीच्या डोक्यावर लावण्यासाठी छत्री अर्पण केली होती. मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून पोलिस प्रशासनाने या चोरीचा तातडीचे छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनादवारे केली आहे. माजी सरपंच नामदेव ठाणगे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच वैशाली उघडे, दिनकर गव्हाणे, धोंडीभाउ ठाणगे, राजेंद्र करंदीकर, सलीम इनामदार यांच्यासह ग्रामस्थांनी आरोपींसह मुद्देमालाचा शोध न लावण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, चोरटय़ांनी गाभाऱ्यातील दानपेटीस मात्र हात लावला नाही. ही दानपेटी छोटय़ा आकाराची असून ती सहजपणे उचलून नेणे शक्य होते.