सनी देओलचा सिनेमा अशी त्याची एक प्रतिमा प्रेक्षकांमध्ये तयार झाली आहे. ‘ढाई किलो का हाथ’, ‘सच्चाई’ आणि सनी देओल स्टाईल हाणामारी हे त्याच्या सिनेमाचे वैशिष्टय़ ‘सिंग साहब द ग्रेट’ या सिनेमात तंतोतंत उमटले आहे. सनी देओलच्या निस्सीम चाहत्यांसाठीचा हा सिनेमा आहे.
‘बदला’ आणि ‘बदलाव’ या दोन हिंदीतील शब्दांची गर्जना  सनी देओल करतो आणि त्याभोवती सिनेमा बेतलेला आहे. सत्य नेहमीच कटू असते आणि सत्याची बाजू असेल तरच विजय निश्चित असतो हे बिंबवण्याचा प्रयत्न करणारा हा आणखी एक सिनेमा म्हणता येईल. अर्थात प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात सिनेमा आणि सनी देओल चांगलाच यशस्वी ठरला आहे हे मात्र खरे. परंतु, सरधोपटपणा आणि हिंदी सिनेमा हे समीकरण काही बदललेले नाही.
सरनजीत तलवार हा खरे तर पेशाने जिल्हाधिकारी. भ्रष्टाचारी व्यवस्था सुधारण्याचा त्याने विडा उचललाय आणि कमालीच्या सच्चेपणाने काम करून सरकारी नोकरी म्हणजे लोकांची सेवा असते या धोरणाने तो काम करतो. त्यामुळे अर्थातच व्यवस्थेतील भ्रष्टाचारी लोक, राजकारणी यांचा तो कर्दनकाळ ठरतो. त्यामुळे अर्थातच वारंवार निरनिराळ्या ठिकाणी त्याच्या बदल्या केल्या जातात. भदौरी या  उत्तर प्रदेशातील एका ठिकाणी त्याची बदली होते आणि म्हणून त्याची बायको वैतागते. भदौरी गावचा स्वत:ला राजा मानणारा भूदेव सिंगचे सगळे काळे धंदे बंद झाल्यामुळे तो सरनजितविरुद्ध कटकारस्थान करतो आणि सरनजितचे जीवनच बदलून जाते. कटकारस्थानाचा बळी पडल्यानंतर जिल्हाधिकारी सरनजितला तुरुंगावास भोगावा लागतो. मग तिथून बाहेर पडल्यानंतर सरनजित सूड उगविणार हे सर्वसामान्य प्रेक्षकाला लगेच समजते. परंतु, तो सूड घेण्याऐवजी म्हणजे ‘बदला’ घेण्याऐवजी ‘बदलाव’  घडवून आणायचे ठरवितो. बंदिस्त पटकथेतील भावनिक प्रसंग, सरनजित आणि त्याच्या बायकोचे प्रेम, भरपूर गाणी याद्वारे करमणूक करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
दिग्दर्शक-कलावंत जोडी म्हणावी अशी अनिल शर्मा-सनी देओल जोडीचा हा सिनेमा सरधोपटपणाने ग्रासला असला तरीही संवादांमुळे प्रेक्षकाचे रंजन करतो. हाणामारीची दृश्यं, त्यात सनी देओलचा ‘ढाई किलोचा हाथ’ आहे म्हटल्यावर देशी स्टाईलची मारामारी आवडणाऱ्या प्रेक्षकांचे बिनडोक पण निखालस मनोरंजन करणारी ठरते.
परंतु, खटकणारी बाब म्हणजे सनी देओल-अनिल शर्मा या जोडीचा हा सिनेमा २०१३ मधला वाटत नाही. कारण नवीन काहीच करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. एकामागून एक बटबटीत चित्रण आणि भडक रंग दाखविणारी गाणी घुसडल्यामुळे दोन हाणामारीच्या दृश्यांमध्ये एक गाणे अशा पद्धतीने चित्रपट पडद्यावर दिसत राहतो.
‘फ्लॅशबॅक’ तंत्र वापरल्यामुळे काही काळ प्रेक्षक सनी देओलच्या व्यक्तिरेखेशी समरस होतो. अर्थात सनी देओलच्या चाहत्यांसाठीच  बनविलेला सिनेमा असल्यामुळे कोणतीही गोष्ट, कितीह बटबटीतपणे मांडली तरीही सनी देओलचा चाहतावर्ग खुश असतो.
सिंग साहब द ग्रेट
निर्माता – संगीता अहिर, अनुज शर्मा
दिग्दर्शक – अनिल शर्मा
पटकथा – शक्तिमान तलवार
संगीत – आनंद राज आनंद, सोनू निगम
कलावंत – सनी देओल, अमृता राव, उर्वशी रौटेला, जॉनी लिवर, संजय मिश्रा, प्रकाश राज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singh saab the great is just for sunny deols fans
First published on: 24-11-2013 at 02:45 IST