महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाडय़ातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘मराठवाडा परिवार’ ही संस्था पुढे सरसावली आहे. मूळ मराठवाडय़ातील पण आता मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांनी सुरू केलेल्या या संस्थेतर्फे २५ एप्रिल रोजी षण्मुखानंद सभागृहात ‘सितार फंक’ हा फ्युजन संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीतून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांना दिला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी आपण मराठवाडय़ात गेलो होतो. त्या वेळी तेथील परिस्थिती पाहून आपल्या लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार मनात आला. दरवर्षी आम्ही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करत असतो. त्यामुळे या सर्वच कलाकारांशी घरोब्याचे संबंध असल्याने आम्ही नीलाद्री कुमार यांच्याशी चर्चा करून ‘सितार फंक’ हा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले, असे ‘मराठवाडा परिवार’चे कार्यवाह शशी व्यास यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा निधी कोणाच्याही हाती सुपूर्द केला जाणार नाही. तर या निधीतून आम्ही बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील काही गावांत पाण्याच्या टाक्या, गुरांना पाणी पिण्यासाठी हौद पुरवणार आहोत, असेही व्यास यांनी स्पष्ट केले.
दर कार्यक्रमात आम्ही आमच्या आनंदासाठी वाजवत असतो. मात्र आपल्यापैकीच काही लोक पाण्यासाठी वणवण फिरत असताना त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्यासाठी आम्ही सर्व २५ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता एकत्र येऊन आपली कला सादर करणार आहोत, असे नीलाद्री कुमार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तर, या कारणासाठी निधी संकलन करण्याची वेळ पुन्हा येऊ नये, ही प्रार्थना करतच आम्ही हा कार्यक्रम सादर करणार आहोत, असे सत्यजित तळवलकर यांनी सांगितले. या कार्यक्रमात नीलाद्री कुमार, लुईस बँक्स, गीनो बँक्स, सत्यजित तळवलकर, शेल्डन डिसिल्व्हा आणि अॅग्नेलो फर्नाडीस हे एकत्र येऊन शास्त्रीय व पाश्चात्य संगीताचे फ्युजन सादर करतील.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सतारीचा झंकार
महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाडय़ातील उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘मराठवाडा परिवार’ ही संस्था पुढे सरसावली आहे. मूळ मराठवाडय़ातील पण आता मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांनी सुरू केलेल्या या संस्थेतर्फे २५ एप्रिल रोजी षण्मुखानंद सभागृहात ‘सितार फंक’ हा फ्युजन संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
First published on: 23-04-2013 at 01:45 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitar funk fusion musical programme for the help of drought affected