आडत आकारणीच्या दराबाबत आडत्यांनी पुकारलेला बंद मागे घेतल्यानंतर गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील व्यवहार शुक्रवारी सुरळीत झाले. मात्र, सहा टक्क्य़ांपर्यंतच आडत आकारणी करण्याच्या शासनाच्या आदेशाला काही आडत्यांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आडत आकारणीचा तिढा अद्याप सुटला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्केट यार्डमध्ये शुक्रवारी मोठय़ा प्रमाणावर शेतमालाची आवक झाल्याने भाज्यांचे दर पूर्ववत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
शेतीमालावर सहा टक्के आडत आकारण्याबाबत शासनाने काढलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी गुलटेलडी येथील आडते असोसिएशनच्या वतीने शनिवारपासून बंद पुकारण्यात आला होता. बंदमुळे शेतीमालाची आवक घटली व त्याचा परिणाम म्हणून भाज्यांचे भाव भडकले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी थेट मालाची विक्री करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात बाजारात शेतीमाल येत असला तरी शहरात भाज्यांचे भाव कमी झाले नव्हते. स्थनिक बाजारांमध्ये भाज्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.
आडत्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी पणन संचालकांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे प्रतिनिधी व आडत्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात आडत आकारणीबाबत आडत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या बैठकीनंतर बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत झालेल्या चर्चेचा सविस्तर अहवाल पणन संचालकांकडून राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर शासनाकडून निर्णय जाहीर करण्यात येईल. मात्र, बाजार पुन्हा सुरू होताना सहा टक्के आडत आकारणीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पणन संचालकांनी जाहीर केले होते. त्यामुळे बाजार सुरू झाल्यानंतर नेमके काय होते, याबाबत उत्सुकता होती.
बंद मागे घेतल्याने राज्याच्या विविध ठिकाणाहून मार्केट यार्डमध्ये मोठय़ा प्रमाणावर शेतमालाची आवक झाली. बंदमुळे शेतात मोठय़ा प्रमाणावर माल पडून असल्याने शेतकऱ्यांनी हा माल बाजारात आणला. त्यामुळे मालाची आवक नेहमीपेक्षा जास्त झाली. पाच दिवसांपासून भडकलेले भाज्यांचे भाव त्यामुळे खाली आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही आडत्यांनी आठ टक्क्य़ांपर्यंत आडत आकारून पुन्हा एकदा त्यांचा निर्णय स्पष्ट केला आहे. त्यामुळे बाजार सुरू झाला असला, तरी आडत आकारणीचा तिढा कायमच राहिला आहे. त्यावर पणन संचालक व कृषी उत्पन्न बाजार समिती काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.