एरवी कुठल्या न कुठल्या कारणाने शिवसैनिकांच्या गर्दीने नेहमी गजबजणारे शहरातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाने सोमवारी नीरव शांततेचा अनुभव घेतला. शिवसेनाप्रमुखांच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप शिवसैनिकांसह पदाधिकारी सावरलेले नाहीत. त्यामुळे या कार्यालयात कमालीची शांतता आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची बातमी आल्यानंतर शहर परिसरातील शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी शालिमार चौकातील कार्यालयात धाव घेतली होती. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांना त्या वेळी अश्रू रोखणे अवघड गेले. ‘शिवसेनाप्रमुख अमर रहे’च्या घोषणा देऊन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक जसे जमेल तसे मुंबईला रवाना झाले. रविवारी सायंकाळी शिवसेनाप्रमुखांच्या अंतिम संस्काराला नाशिकच्या हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावून आपल्या दैवताला अखेरचा निरोप दिला. त्यानंतर बहुतेक जण मध्यरात्रीच नाशिकला परतले असले तरी या धक्क्यातून ते अद्याप सावरू शकलेले नाहीत. सोमवारी बहुतेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी आपला दिनक्रम सुरू केला नाही. शालिमार चौकातील पक्षाच्या कार्यालयात फारशी कोणी हजेरी लावली नाही. पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात काय सुरू आहे याबद्दल विचारणा केली नाही.
एरवी, शिवसेनेच्या या कार्यालयात शिवसैनिकांची चांगलीच चहलपहल असते. बैठक वा आंदोलन याची रूपरेषा ठरविण्यासाठी कायम जमणारे शिवसैनिक रविवारपासून कार्यालयाकडे आलेले नाहीत. कार्यालयात एकदम शांतता असून शिवसैनिक बोलण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे कार्यालयीन प्रमुख राजेंद्र वाघसरे यांनी सांगितले. कार्यालयात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिक येत आहेत. गुलाबपुष्प अर्पण करून नतमस्तक होणारे हे घटक वगळता कार्यालयातील जवळपास संपूर्ण कामकाज थंडावले असल्याचे वाघसरे यांनी नमूद केले.
बाळासाहेबांच्या निधनाने शिवसैनिकांमध्ये पोरके झाल्याची भावना आहे. गटप्रमुखासह विविध पदांवर काम करणाऱ्या वाघसरे यांना या काळात पाच ते सहा वेळा बाळासाहेबांना भेटण्याचा योग आला. त्यांचे जवळून दर्शन घेता आले. दोनदा तर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ते मातोश्रीवर गेले होते. त्या वेळी बाळासाहेबांचा खऱ्या अर्थाने परिचय झाला. कुठलाही मोठा पदाधिकारी, राजकीय नेता, उद्योजक, अभिनेता वा महनीय व्यक्ती असेल आणि त्याच वेळी कोणी शिवसैनिक तिथे आला असेल तर पहिल्यांदा त्या शिवसैनिकाची भेट होई. त्यानंतर बाकीची कामे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना तह्यात जीव लावला. त्यांच्या या खास शैलीमुळे पक्षाशी प्रत्येकाशी नाळ जोडली गेली. शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे धक्का बसलेल्या जवळपास प्रत्येक शिवसैनिकांची अशीच भावना आहे. या धक्क्यातून सावरू न शकल्याने शिवसेनेच्या कार्यालयात ही शांतता असल्याचे अधोरेखित होत आहे.