अनमोलनगरात एसएनडीएलच्या नव्या ११ केव्ही वीज वाहिनीचे लोकार्पण  आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. यामुळे वाठोडा अंतर्गत वारंवार वीज खंडित होण्याच्या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली आहे. वाठोडा रिंग रोड, गजानन नगर, गिड्डोबा नगर, सरजू टाऊन, सदाशिव नगर, साई नगर, चैतन्य नगर, श्रीराम नगर आदी भागातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, एसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराणा, नगरसेविका मनीषा कोठे, प्रवीण नरड प्रामुख्याने उपस्थित होते.  नागरिकांच्या वीज समस्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्या वेळीच सोडविण्याचा प्रयत्न करणारे चंद्रशेखर पिल्ले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नवीन ट्रान्सफार्मरमुळे वाठोडा भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कार्यक्रमाला कांता रारोकर, महेंद्र राऊत, सुभाष कोटेचा, रामकुमार गुप्ता, नेत्रपालसिंग, योगिता कस्तुरे, नरेश ठाकूर, बाल्या रारोकर, पयोज पांडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, पूर्व नागपुरात ७.९९ कोटींची विकास कामे जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंजूर केली आहेत. दलित वस्ती सुधार योजना, शायकीय बचत निधी व आमदार निधीतून ही कामे केली जाणार आहेत. डिप्टी सिग्नल, शांतीनगर, संघर्षनगर, नंदनवन झोपडपट्टी, भांडेवाडी, आदर्शनगर, हिवरीनगर, कुंभारटोली, मिनीमातानगर, लालगंज या भागात ४.३७ कोटींची सिमेंट रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. पारडीत २.१८ कोटीची रस्त्यांची कामे, भांडेवाडी व अन्य ठिकाणी २१ लाख रुपये खर्च करून समाज भवन उभारले जाणार आहे. रस्ता खडीकरण, डांबरीकरण, पथदिवे, कुपनलिका आदी कामे पूर्व नागपुरात केली जाणार आहेत.