महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी माजलगाव तालुक्यातील जय महेश या खासगी कारखान्याविरुद्ध आपल्या समर्थकांमार्फत सहकार आयुक्तांकडे खोटय़ा तक्रारी करताना उसाच्या बनावट नोंदी केल्याचे दाखवून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू केला, असा आरोप करून उसाच्या नोंदी खोटय़ा ठरवण्याचा मंत्र्यांना अधिकारच नाही व कारखाना बंद पडू देणार नाही, असा इशारा भाजपाचे सरचिटणीस गंगाभीषण थावरे यांनी दिला.
माजलगाव मतदारसंघात मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. राष्ट्रवादीचे नेते सहकार राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखालील माजलगाव सहकार साखर कारखाना व मागील काही वर्षांपासून जय महेश शुगर हा कारखाना ऊस गाळप करतो. तालुक्यात दोन साखर कारखाने झाल्यामुळे साहजिकच स्पर्धेतून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळून मंत्र्यांची एकाधिकारशाही मोडली गेली. या स्पर्धेत खासगी साखर कारखाना आल्यामुळे मंत्र्यांना उसाला भाव द्यावा लागत आहे. त्यामुळे खासगी साखर कारखाना बंद पाडण्याचा डाव आखला जात आहे. त्यासाठी आपल्या हस्तकांमार्फत जय महेश कारखान्याने उसाच्या बनावट नोंदी केल्याच्या तक्रारी करून साखर आयुक्तांकडून या कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर प्रकल्प व गोदावरीचा कालवा असल्यामुळे उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना या पिकातून आर्थिक लाभ होत आहे. मागच्या वर्षी कारखाना ऊस गाळपास येत नाही, या कारणासाठी एका शेतकऱ्याने उसाच्या फडात जाळून घेतले होते. त्यामुळे जय महेश कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक आहे, असे सांगून हा कारखाना बंद पाडण्याचा सहकारमंत्र्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा गंगाभीषण थावरे यांनी दिला.