कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ ही सार्वत्रिक बाब आहे. मात्र, काही प्रमाणात स्त्रियाही त्यात दोषी असल्याचा सूर निकालस सोमलवार महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उमटला.
 सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त माधुरी गोडसे म्हणाल्या, विषय आकर्षक असला तरी जी व्यक्ती त्याची बळी ठरते तिच्या जीवनाची धूळधाण होते. आपण प्रगत देशाचे नव्हे तर परंपरा आणि रुढीग्रस्त देशाचे नागरिक असून पालक आणि शिक्षकाच्या जबाबदाऱ्या पार पाडतो का, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सभागृहावर सोडून दिले. लैंगिक संबंध ठेवण्यावर क्वचित स्त्रियांकडूनही पुढाकार घेतला जातो. कायदे जरी स्त्रियांच्या बाजूने असले तरी नकार देता आला पाहिजे. घाबरून अत्याचार सहन करू नका तर योग्यरितीने विरोध करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्पष्टवक्तेव्हा. वाईटपण आले तर येऊ द्या पण संवाद साधा, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. डॉ. नंदिनी जठार यांचे अध्यक्षीय भाषण झाले.  प्राचार्य डॉ. आशा भाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दुसऱ्या सत्रात डॉ. शिरीष देशपांडे म्हणाले, कोणत्याही प्रकारचा अत्याचार अस्वीकारार्ह असला तरी अत्याचार ही सार्वत्रिक बाब आहे. अत्याचार करणारा इतरांच्या अधिकारांचे हनन करतो. लिंग, धर्म, जात, सामाजिक स्तर हे घटक व्यक्तीच्या हातात नसतात.तरीही लिंगभेद समाजात कायम आहे.  १९५६पर्यंत महिलांना संपत्तीचा हक्क नाकारण्यात आला होता. तसेच पाल्याचा नैसर्गिक पालक हा आधी पिता आणि त्यानंतर माता असल्याची तरतूद कायद्यात होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नको असलेला स्पर्श, अश्लील भाषा किंवा चित्रफितीचा समावेश लैंगिक छळामध्ये होतो. असे गुन्हे शिक्षेस पात्र आहेत. पुरुषांचे वर्चस्व कमी करण्यासाठी स्त्रियांचे वर्चस्व वाढवणे म्हणजे न्याय नाही तर कायद्याच्या अंमलबजावणीत लिंगभेदाला थारा असू नये, असे देशपांडे म्हणाले. अत्याचाराच्या कायद्यामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचा बनाव करणाऱ्या स्त्रीवर देखील कारवाई करण्याची तरतूद आहे.
सभागृहात शाब्दिक चकमक
गोडसे यांच्या सत्राच्या दरम्यान सावनेरच्या आदमने महाविद्यालयातील शिक्षक मिलिंद साठे यांनी एका महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी काहीच उपाययोजना न केल्याचे म्हटले. आयोजकांपैकी असलेले पराग निमिषे यांनी प्रकरणाची माहिती येथे कोणालाही नसल्याचे सांगून यावर आक्षेप घेतला. मात्र, गोडसे आणि आयोजकांनी त्यास हरकत घेतल्याने काही काळ सभागृहात शाब्दिक चकमक झाली. काहीवेळा महिलांकडूनही खोटय़ा तक्रारी किंवा अतिरेक होतो, असे मत निमिषे यांनी व्यक्त केले.