उड्डाणपुलांवरील सततची रहदारी, गाडय़ांचा आवाज यामुळे आसपासच्या रहिवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबईतील सहा उड्डाणपुलांवर ध्वनीरोधक यंत्रणा (नॉइज बॅरियर) बसवण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतली होती. परंतु त्यात राज्य सरकारच्याच आदेशाचा अडथळा उभा ठाकला आहे. सरकारकडे पाठपुरावा करूनही अद्याप सुधारित आदेश न मिळाल्यामुळे हे काम रखडले आहे.
मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहर व उपनगरात ठिकठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले. त्यामुळे खासगी गाडय़ांची संख्या मोठय़ाप्रमाणात वाढली आणि उड्डाणपुलावरील गाडय़ांची ये-जा, त्यांच्या हॉर्नचे आवाज यामुळे पुलाच्या आसपासच्या रहिवाशांना सतत गोंगाटाचा त्रास सहन करावा लागतो. अशाच पद्धतीच्या त्रासामुळे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगरच्या बंगल्यांच्या मागील बाजूने वांद्रे-कुर्ला संकुलात जाणाऱ्या रस्त्यावरील आवाजाचा त्रास कमी झाला. सुमारे एक किलोमीटरच्या पट्टय़ात ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्यासाठी त्यावेळी आठ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च आला होता. नंतर पवई आयआयटी संकुलाच्या बाहेरही अशी यंत्रणा बसवण्यात आली.
हे प्रयोग यशस्वी झाल्याने शीव, किंग्ज सर्कल, हिंदमाता, लालबाग या डॉ. आंबेडकर मार्गावरील चार उड्डाणपुलांवर व चेंबूर येथील सुमननगर व मुलुंड येथील नवघर अशा एकूण सहा उड्डाणपुलांवर ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला. त्यासाठी २०१२-१३ या आर्थिक वर्षांत ३७ कोटी ६० लाख रुपयांची तरतूदही केली. मात्र, उड्डाणपुलांवरील ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्याबाबतच्या नियम व अटी सांगणारा एक आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काही वर्षांपूर्वी काढला होता. तो व्यवहार्य नसल्याने प्राधिकरणाने त्यास आक्षेप घेणारे पत्र व सुधारित मसुदा नगरविकास विभागाकडे पाठवला. पण गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यावर कसलाही निर्णय झालेला नाही. या निर्णयाअभावी ‘एमएमआरडीए’ला उड्डाणपुलांवर ध्वनीरोधक यंत्रणा बसवण्याचे काम सुरू करता येत नाही. त्यामुळे काम रखडले आहे.
प्रत्येक ठिकाणच्या परिस्थिती व आवाजाच्या पातळीनुसार ध्वनीरोधक यंत्रणा कोणत्या प्रकारची वापरायची, त्याचा आराखडा कसा असावा हे ठरत असल्याने त्यानुसार वेगवेगळय़ा उड्डाणपुलांवर भिन्न प्रकारची यंत्रणा बसवावी लागेल. त्यासाठी सल्लागार नेमून अहवाल मागण्यात येत आहे. पण सरकारकडून स्पष्ट आदेश येईपर्यंत उड्डाणपुलांनजीकच्या लोकांना गोंगाटाचा त्रास असाच सहन करावा लागणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2012 रोजी प्रकाशित
उड्डाणपुलांवरील ध्वनीरोधक योजना लाल फितीत!
उड्डाणपुलांवरील सततची रहदारी, गाडय़ांचा आवाज यामुळे आसपासच्या रहिवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मुंबईतील सहा उड्डाणपुलांवर ध्वनीरोधक यंत्रणा (नॉइज बॅरियर) बसवण्याची योजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतली होती.
First published on: 26-12-2012 at 02:06 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound equalise system of flyovers is in red signal